बुधवार, २० एप्रिल, २०१६

'चैत्रेय' वासंतिक


मराठीत दिवाळी अंकाची एक परंपरा आहे. दरवर्षी मराठीत कथा, कविता, कादंबरी, व्यंगचित्रे, लेख आदी साहित्य असलेले किंवा पाककला, ज्योतिष, आध्यात्मिक, पर्यटन अशा विशिष्ट विषयांना वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरु आहे. मराठीत ज्या प्रकारे दरवर्षी दिवाळी इतक्या मोठ्या प्रमाणात (साडेतीनशे ते चारशे) अंक निघतात तसे अन्य कोणत्याही भारतीय भाषेत निघत नाहीत.

दिवाळी अंकाच्या परंपरेप्रमाणेच चैत्र महिन्यात वासंतिक अंकाची परंपरा सुरु व्हावी या उद्देशाने प्रा. नरेंद्र पाठक यांनी 'चैत्रेय वासंतिक' ची सुरुवात केली. गेली १४ वर्षे नियमितपणे चैत्र महिन्यात 'चैत्रेय' प्रकाशित होत असून यंदाच्या वर्षी १५ वा अंक नुकताच प्रकाशित झाला. प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी यंदाच्या चैत्रेयच्या मुखपृष्ठावर दलाल यांनी रेखाटलेले छायाचित्र देण्यात आले आहे. या चित्राच्या संदर्भात चित्रकार विजयराज बोधनकर यांचा विशेष लेखही अंकात आहे.

कथा, मुलाखत, लेख, कविता यासह खास बालविभागही अंकात देण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांची प्रा. नरेंद्र पाठक यांनी घेतलेली खास मुलाखत अंकात आहे. मॉं रेवा तेरा पानी निर्मल (अश्विन पुंडलिक),नाटक, सिनेमा आणि देश (सुधीर जोगळेकर), टोकिओची सडक सुरक्षा संस्कृती (नि.श. गुळवणी), गुलमोहराचा जळलेला बुंधा (सतीश सोळांकूरकर), बाया कर्वे आणि तिचा संसार (अशोक बेंडखळे), गीत आणि गझलचा बादशाह संगीतकार मदनमोहन (शरद सोनवणे) व अन्य लेख यात आहेत.

दहा कथा, वीस कविता यासह अंकात विशेष बालविभाग देण्यात आला आहे. नव्या पिढीवर वाचनाचा संस्कार व्हावा, त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी 'चैत्रेय'च्या अंकात काही पाने बालवाचकांसाठी राखून ठेवली जातात. या विभागात गोष्टी, कविता, गाणी, नाट्यछटा, काव्यकोडी असा विविधांगी मजकूर आहे. एकनाथ आव्हाड यांनी या बालविभागाचे संपादन केले आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 'चैत्रेय'चे खास समारंभात प्रकाशन करण्याची पद्धत प्रा. पाठक यांनी सुरु केली आहे. पहिल्या अंकाचे प्रकाशन ठाणे व अंमळनेर येथे २००२ मध्ये झाले होते. आत्तापर्यंत दादर, रत्नागिरी, विलेपार्ले, मुलुंड, गेट वे ऑफ इंडिया येथे भर समुद्रात बोटीवर, नाशिक, वाशी, कल्याण, औरंगाबाद, इंदूर येथे अंकाचे प्रकाशन झाले आहे. यंदाच्या अंकाचे प्रकाशन बडोदे येथे झाले.

'चैत्रेय'च्या रुपाने वासंतिक अंक सुरु करण्याची परंपरा अंकाचे संपादक आणि प्रकाशक प्रा. पाठक यांनी सुरु केली असून हा प्रयोग वाचकांच्याही पसंतीस उतरला आहे.

प्रा. नरेंद्र पाठक यांचा संपर्क

०२२-२५४१६९११/९८६९६८४०८६/९१६७४०६०५०

ई-मेल आयडी chaitreya@yahoo.com

@शेखर जोशी

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

माझे स्वाक्षरी पुराण


आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी म्हणजे शालेय वयात पोस्टाची तिकिटे गोळा करणे, वेगवेगळ्या देशातील नाणी व नोटा जमविणे, मान्यवर व्यक्तींच्या स्वाक्षऱया घेणे असे छंद असतात. पुढे ते जोपासले जातात किंवा थांबतात. मी शाळेत असताना मलाही मान्यवर व्यक्तिंच्या स्वाक्षऱया जमा करण्याचा छंद होता. या स्वाक्षऱया आठवी ते दहावी-बारावीपर्यंतच्या काळात जमा केलेल्या आहेत. डोंबिवलीमध्ये तेव्हाही अनेक साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि आजही होत असतात. त्या कार्यक्रमाला जाऊन या पैकी काही मान्यवरांच्या स्वाक्षऱया घेतलेल्या आहेत. तर काही स्वाक्षऱया डोंबिवलीतील भरत नाट्य मंदिर या खुल्या नाट्यगृहात झालेल्या नाट्य प्रयोगाच्या वेळी घेतलेल्या आहेत.

सुनील गावसकर यांच्या स्वाक्षरीची आठवण मनात घर करुन आहे. परदेशातील मोठा दौरा जिंकून भारतीय संघ मुंबईत परतला होता. गावसकर हे संघाचे कप्तान होते. त्या निमित्ताने गावसकर यांचा सत्कार डोंबिवली नगरपालिकेच्या कार्यालयातील मोकळ्या जागेत झाला होता. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावर जाऊन त्या गर्दीत गावसकर यांची सही घेतल्याचे आठवत आहे.

'सौजन्याची ऐशी तैशी' या नाटकाच्या वेळी अभिनेते राजा गोसावी यांची घेतलेली सही (८-१२-८४) माझ्या संग्रहात आहे. अभिनेते अजय वढावकर यांचीही स्वाक्षरी आहे. जर मी चुकत नसेन तर 'पळा पळा कोण पुढे पळे तो'या नाटकात भक्ती बर्वे काम करत होत्या. त्यांच्यासह माधव वाटवे, आत्माराम भेंडे हे कलाकारही या नाटकात होते. हे नाटक भरत नाट्य मंदिर येथे पाहिले. त्या वेळेस या तिघांच्या स्वाक्षऱया घेतल्या. अभिनेते यशवंत दत्त, जयंत सावरकर, अभिनेते, दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याही स्वाक्षऱया संग्रहात आहेत.

लहान मुलांसाठी लिहिणारे भा. रा. भागवत (फास्टर फेणे प्रसिद्ध) आणि लिलावती भागवत, वाचकप्रिय लेखक बाबा कदम, लक्ष्मण माने, कुमुदिनी रांगणेकर, कवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन, कुमार केतकर, अरुण साधू, कवीवर्य शंकर वैद्य, गायिका उत्तरा केळकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, वृत्तनिवेदक व सूत्रसंचालक प्रदीप भिडे, लेखक व नाटककार जयवंत दळवी, वसंत सबनीस, समीक्षक प्रा. माधव मनोहर, लेखक व नाटककार आणि आमचे डोंबिवलीकर असलेले शं. ना.नवरे, 'बलुत'कार दया पवार, व्यंगचित्रकार बळी लवंगारे, दूरदर्शनचे निर्माते 'ज्ञानदीप'कार आकाशानंद, ज्येष्ठ संगीत समीक्षक, तज्ज्ञ आणि आवाजाची जोपासना कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे अशोक दा. रानडे, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (मराठीतील), विक्रमवीर धनंजय कुलकर्णी यांच्यासह कवी व लेखक रमेश तेंडुलकर (आत्ताच्या पिढीसाठी सचिन तेंडुलकर याचे वडील) यांचीही स्वाक्षरी संग्रहात आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणावर झाली होती. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांची स्वाक्षरी घेतल्याचे आठवते. स्वाक्षरी घेताना काही मान्यवरांनी त्या खाली तारीख टाकलेली आहे. पण ज्यांनी ती टाकली नाही त्या स्वाक्षरीच्या खाली ती सही केव्हा घेतली त्याची तारीख किमान मी तरी टाकायला हवी होती, असे आता वाटते.

स्वाक्षरी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण ती एक-दोन मिनिटे या मान्यवरांशी थेट बोलता व भेटता आले हा आनंद व समाधान खूप मोठे आहे...

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारले की आपल्याला आठवते त्यांनी दलित आणि स्त्रियांच्या मुलभूत हक्कांसाठी केलेले कार्य आणि भारताची राज्यघटना. त्यांच्या या कामाबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी फारसा प्रकाशात न आलेला एक भाग व तो म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम आणि आस्था.

लेखक व प्राध्यापक प्र.शं. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरुपात भीमायन हे चरित्र काव्य लिहिले आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील या प्रा. जोशी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी हे चरित्र लिहिले. डॉ. आंबेडकर यांना संस्कृत भाषेविषयी किती आदर होता आणि संस्कृत भारताची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉ. आंबेडकर यांनी कसे प्रयत्न केले ते यात वाचायला मिळते.

दलित महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्यात यावी, असा ठराव मांडला होता. हिंदी प्रमाणेच राष्ट्रभाषेच्या जागी संस्कृत भाषा असावी, अशी त्यांची इच्छा होती. संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या भारतीय भाषांना जन्म देणारी, विद्वानांना नेहमीच आदरणीय वाटणारी अशी ही संस्कृत भाषा भारताची राष्ट्रभाषा होण्यास योग्य आहे, अशा शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखीत करत हा ठराव मांडला होता.

पुढे घटना समितीच्या बैठकीतही डॉ. आंबेडकर यांच्यासह भारताच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री डॉ. बी. व्ही. केसकर आणि खासदार नजिरुद्दिन अहमद यांनी संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी, असा प्रस्ताव/ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांनीही त्याला पाठिंबा दिला. पं. मैत्र यांना डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या. आणि डॉ. आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

मात्र घटना समितीच्या सभेतील अनेकांच्या विरोधामुळे संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्याचा हा ठराव/प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. संस्कृत भाषेवर मनापासून प्रेम करणाऱया डॉ. आंबेडकर यांच्यासह अनेकांना वाईट वाटले.

डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून, त्यांचा सखोल अभ्यास करुन नवीन कायदे करुन राज्य घटनेत स्त्रिया व दलितांच्या हक्कांचा समावेश केला. यासाठी त्यांनी भारद्वाज, याज्ञवल्क्य आदी स्मृतीग्रंथाचाही अभ्यास केला. डॉ. आंबेडकर यांचे हे संस्कृतप्रेम, त्यांनी मांडलेला हा ठराव याबाबतची माहिती प्रा. जोशी यांनी लिहिलेल्या भीमायन या ग्रंथात आहे. या ग्रंथातील ही माहिती देणारे श्लोक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता १० वी संस्कृत संपूर्ण या पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे.

-शेखर जोशी

रविवार, ३ एप्रिल, २०१६

लगीन घाई


बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या नायक-नायिकांचे चित्रपटात शुभमंगल होऊन चित्रपटाचा ‘दी एण्ड’ होतो. पडद्यावरील काही नायक-नायिका वास्तव जीवनातही ‘शुभमंगल’ करतात. काही जोडय़ांचे हे शुभमंगल दीर्घकाळ टिकते तर काहीं जोडय़ांच्या बाबतीत ते ‘औटघटकेचे’ ठरते. अलीकडेच बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींचे शुभमंगल झाले असून काहींचे वर संशोधन सुरु आहे. पूर्वीच्या काळी बहुतांश लग्नं ही अगदी लहान वयातच होत असत. नंतरच्या काही वर्षांत मुलीच्या लग्नाचे वय सरासरी २२ ते २४ पर्यंत गेले आणि आता उच्च शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे ते २५ ते ३० पर्यंत किंवा त्या ही पुढे गेले आहे. अर्थात हे सर्वसामान्यांच्या बाबतीत झाले. बॉलीवूडमधील सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. बॉलीवूडच्या काही नायिका वय उलटून गेले तरी लग्न करत नाहीत, काही जणी वय उलटल्यानंतर लग्न करतात, काहीतर लहान वयातच ‘शुभमंगल’ करून टाकतात. तर काही जणी आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या मुलाशी लग्न करतात. ऊर्मिला मातोंडकर, प्रीती िझटा यांनी अलीकडेच त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांशी लग्न केले. लग्नाच्या वेळी या दोघींचेही वय जास्त होते. म्हटले तर लग्नाचे वय उलटून गेलेले होते. वाढत्या वयात लग्न केलेल्या ‘या’ नायिकांपेक्षा लहान वयात लग्न केलेल्या बॉलीवूडच्या ‘त्या’ नायिकांना ‘बालिका वधू’च म्हणावे लागेल.

बॉलीवूडची ‘रंगीला’गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिने नुकतेच तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मोहसीन अख्तर मीर या व्यावसायिकाशी लग्न केले. तर तिच्या अगोदर अभिनेत्री प्रीती झिंटानेही तिच्यापेक्षा लहान असलेल्या जेन गुडईन फशी या अमेरिकन मित्राबरोबर लग्न केले. लग्नाच्या वेळी ऊर्मिलाचे वय ४२ होते. पण बॉलीवूडच्या इतिहासावर सहज नजर टाकली तर लग्नाच्या वेळी बॉलीवूडच्या या नायिकांचे वय कमी होते, अशीही काही उदाहरणे पाहायला मिळतात. वय वर्षे १८ ते २५ किंवा २७ या वयात त्यांनी ‘दोनाचे चार हात’ केलेले दिसते. लग्न करत असताना यापैकी काही जणींनी बॉलीवूडमध्ये पदार्पणातच आपले बस्तान बसविलेले होते. लग्न झाल्यानंतर त्याचा चित्रपट किंवा अभिनय कारकीर्दीवर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्यांनी ‘आले मना मी करून टाकते लग्ना’ असे पाहायला मिळते. लहान वयात लग्न केलेल्या अभिनेत्रींमध्ये ठळकपणे समोर येणारे नाव म्हणजे अभिनेत्री डिम्पल. डिम्पलने राजेश खन्नाशी लग्न केले तेव्हा तो बॉलीवूडचा सुपरस्टार होता तर डिम्पलची ‘बॉबी’पासून अभिनय कारकीर्द सुरू झाली होती. या लग्नाच्या वेळी डिम्पल अवघी १७ वर्षांची होती. डिम्पल व राजेश खन्ना यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या वयात थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७ वर्षांचे अंतर होते. पण प्रेमात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हणतात. डिम्पल आणि राजेश खन्ना यांचे लग्न त्या वेळी खूप गाजले होते. बॉलीवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमारपेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते. पण तरीही त्यांचे लग्न झाले आणि ते ‘शुभमंगल’ आजपर्यंत टिकून आहे. बॉलीवूडची ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची लग्नही त्या काळी गाजले. १९५२ मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी मीनाकुमारीचे वय फक्त २१ होते. लग्नानंतर १४ वर्षांनी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

बॉलीवूडची अभिनेत्री दिव्या भारती हिचे अकाली निधन झाले. मोजकेच चित्रपट केलेल्या दिव्या भारतीने तरुणांच्या मनावर काही काळ अधिराज्यही गाजविले. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक साजिद नडियाडवाला यांच्याशी लग्न केले. या दोघांची ओळख ‘शोला और शबनम’या चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी झाली होती. १० मे १९९२ रोजी या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दहा-अकरा महिन्यात तिचा मृत्यू झाला. दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होती. बॉलीवूडचा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून ज्याची ओळख आहे त्या रणबीर कपूरचे आई-बाबा अर्थात नितू सिंह व ऋषी कपूर हेही याच क्षेत्रातील. दोघांचाही प्रेमविवाह. ‘जहरिला इन्सान’या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात झाले. १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी नितू सिंहचे वय २१ होते. अभिनेत्री आयेशा टकिया आणि फरहान आझमी (समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचा मुलगा) यांचे लग्न झाले तेव्हा आयेशाचे वय २३ इतके होते. दोघे जण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, मित्र होते. बॉलीवूड ‘खान’दानातील एक सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन या दोघांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट त्या काळी खूप गाजला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ‘हिट’ म्हणून गणला गेला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतरही भाग्यश्रीने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्याशी लग्न केले आणि चित्रपट संन्यास घेतला. पण प्रेक्षक अद्यापही भाग्यश्रीला अद्यापही विसरलेले नाहीत. भाग्यश्रीचे लग्नाच्या वेळी वय २१ होते. ‘ही मॅन’ धर्मेद्र ‘ड्रीम गर्ल’ हेमामलिनी तसेच अमिताभ बच्चन व जया भादुरी यांचेही लग्न गाजले.

बॉलीवूडची लग्ने किती टिकतात किंवा किती मोडतात हा वेगळा विषय आहे. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या काही जोडय़ांचे वास्तवातही लग्न झाले ते दीर्घकाळ टिकले तर काही जणांचे मोडले. काहींनी लग्न मोडल्यानंतर पुन्हा दुसऱ्याबरोबर लग्न केले. काहींनी केलेच नाही. ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे म्हटले जाते. असे असले तरी बॉलीवूडच्या लग्नाचा हा एकूणच प्रवास मनोरंजक आहे.

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता-मुंबई/रविवार वृत्तान्त/३ एप्रिल २०१६/ पान क्रमांक १)

शनिवार, २६ मार्च, २०१६

'जित्या'ची खोड


काही जणांना विषय कोणताही असो त्यात नाक खुपसायची सवयच असते. येन केन प्रकारेण चर्चेत व बातम्यात राहण्यासाठीची ही धडपड असते. 'थोरल्या' साहेबांचा हात कायम आपल्या पाठीवर कसा राहिल, याचीही दक्षता ही मंडळी घेत असतात. अशी 'जित्या'ची खोड अनेकांना असते.

याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे पुण्यातील फर्ग्यसन महाविद्यालयातील प्रकरण. इतिहासाचा किती विपर्यास करायचा, त्यालाही काही मर्यादा असते.काही 'जित्या'ना कायम फुले, शाहु, आंबेडकर यांच्या नावाचा जप करायची सवय लागलेली असते. पण हे करताना इतरांचे थेट सांगायचे तर ब्राह्मणांचे कर्तृत्व, त्यांनी दिलेले सामाजिक योगदान, त्यांनी केलेल्या सामाजिसुरुचक सुधारणा ते जाणीवपूर्वक नाकारतात. किंवा त्यांच्याबाबत नाहक द्वेष पसरवतात. अनेक 'जित्या'ना त्यातच धन्यता वाटते. पण त्यांना हे कळत नाही की यातून ती मंडळी खुजी होत नाही किंवा त्यांचे योगदान कमी होत नाही तर तुम्ही खुजे ठरता व यातून तुमचा फक्त द्वेष आणि द्वेषच दिसून येतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्र पोहोचविणारे आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करताच अशाच काही 'जित्यां'चे पीत्त खवळले होते.

मागे एकदा मुंब्रा येथे अशाच एका 'जित्या'च्या खोडाने एका पोलीस अधिकाऱयाला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी हा मोर्चा अडवला म्हणून तीळपापड झालेल्यांनी पोलीस अधिकाऱयाशी हुज्जत घालून ही धमकी दिली.

इशरत जहॉं प्रकरण असो, फेस्टिव्हलमध्ये वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यांची चित्रे लावणे असो किंवा ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱया नथुराम गोडसे यांच्यावरील लेख स्मरणिकेत छापण्यात आला म्हणून ती स्मरणिका जाळण्याचे हिंसक आंदोलन असो, अशा 'जित्या'च्या खोड्या सुरुच असतात.

या सगळ्या प्रकरणात अशा 'जित्यां'च्या घरातील वडीलधारी मंडळी आणि थोरले साहेबही मुग गिळून गप्प असतात. ते चकार शब्दाने अशा 'जित्यां'ना काहीही बोलत नाहीत की दटावत नाही. त्यामुळे आपण जे करतो ते बरोबरच आहे, असा समज करुन ते चेकाळतात. अर्थात काही 'जित्यां'च्या थोरल्या साहेबांनाही अप्रत्यक्षपणे तेच हवे असते.

अशा वाचाळ, बोलघेवड्या, चमकेश 'जित्या'नीच राजकारणाची वाट लावली आहे. अर्थात ते सगळीकडेच आहेत. 'जित्या'ही व्यक्ती नसून प्रवृत्ती झाली आहे.

असो. आपल्या आजूबाजूला तुम्हाला असा 'जित्या' आढळून आला तर तो योगायोग.... समजू नये.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

हरवलेली रंगपंचमी


होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीनही उत्सव वेगवेगळे आहे. मात्र आपण या तीनही उत्सवांची गल्लत करतो. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो म्हणून ती रंगपंचमी असते. आपण हल्ली रंगपंचमी विसरून गेल्याने रंगपंचमीतील खरा आनंद हरवून बसलो आहोत. आजच्या या धुळवडीला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी प्रथा होती की फाल्गुन पौर्णिमेला होळीचे पूजन झाल्यानंतर दुसऱया दिवशी त्या होळीतील राख अंगाला लावून आंघोळ केली जायची. ही राख औषधी आणि त्वचाविकार बरे करणारी असायची. अर्धवट जळत राहिलेल्या होळीवर पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ केली जायची. होळीनंतर पाच दिवसांनी येणारा सण म्हणजे रंगपंचमी. या दिवशी परिचित,मित्रमंडळी आपापसात एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करायचे.

मात्र गेल्या काही वर्षात रंगपंचमी ऐवजी आपण धुळवडच रंगपंचमी म्हणून साजरी करू लागलो आहोत. रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱया लोकांवर घातक रसायने मिसळलेल्या रंगाचे किंवा गटाराच्या पाण्याने भरलेले फुगे/पिशव्या फेकून मारणे, रस्त्यावरून टोळक्याने अचकट-विचकट अंगविक्षेप करत फिरणे, समोरचा माणूस आपल्या ओळखीचा नसला तरी त्याच्यावर रंग टाकणे, गुलाल उधळणे, मद्यप्राशन करणे म्हणजेच धुळवड असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे होळीच्या दुसऱया दिवशी अर्थात धुळवडीला जणूकाही अघोषित बंद असल्यासारखी परिस्थिती असते. अनेक जण सकाळी घराबाहेर पडणे टाळतात तर दुकानदार सकाळी दुकाने बंद ठेवणे पसंत करतात.

धुळवडीच्या दुसऱया दिवशी वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवरून पाण्याने/किंवा रंगाने भरलेली पिशवी-फुगा लागल्याने कोणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, घातक रंगांचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे किंवा त्वचेचे झालेले विकार या विषयीच्या बातम्या दरवर्षी येत असतात. घातक रसायने असलेल्या रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळा, असा कितीही कंठशोष केला तरी अपवाद वगळता त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. आपण स्वतला सुसंस्कृत म्हणवतो आणि जे काही करतो ते योग्य आहे का याचा सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे.

एक दिवस जरा गंमत आणि मजा केली तर काय बिघडले, असा सूर धुळवडीला रंग खेळणाऱया मंडळींकडून विचारला जातो. पण उत्सव हा आपल्या आनंदासाठी असतो. रंगाचा बेरंग होत असेल तर तो उत्सव काय कामाचा...