शुक्रवार, २८ मार्च, २०२५
भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन!
गुरुवार, २७ मार्च, २०२५
नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार
फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!
![]() |
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक |
फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!
- शैलेंद्र रिसबुड, प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांचा संयुक्त उपक्रम
शेखर जोशी
डोंबिवली, दि. २७ मार्च
गेल्या काही वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारण्यांनी सण, उत्सव, वाढदिवसाच्या निमित्ताने 'चेहरे फलक' लावून शहर विद्रुप करण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे फलक/बॅनर दिसले की सर्वसामान्य व सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या पाश्र्वभूमीवर लोकमान्य टिळकप्रेमी व त्यांच्या चरित्राचे अभ्यासक शैलेंद्र रिसबूड आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी गेल्या सात वर्षांपासून राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य/विचार मोठ्या फलकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे स्मरणही केले जात आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या फलकावर फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक यांचेच छायाचित्र प्रदर्शित केले जाते. रिसबूड आणि म्हात्रे यांची छायाचित्रे या फलकावर नसतात. तसेच रस्ता किंवा चौकांचे नामफलक न झाकता हा फलक उभारण्यात येत आहे. आणि या दोघांनीही ही गोष्ट आजवर कटाक्षाने जपली आहे. संयोजक शैलेंद्र रिसबुड व सौजन्य प्रल्हाद परशुराम म्हात्रे अशी एक ओळ या फलकाच्या खाली लिहिण्यात येते.
![]() |
लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक |
मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील मोकळ्या जागेत हा फलक लावण्यात येतो. लोकमान्य टिळक यांची जयंती, पुण्यतिथी, गीता रहस्य ग्रंथ जयंती ( लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे की या ग्रंथाचा जयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी येत्या ३० मार्च रोजी गीतारहस्य जयंती असून त्या निमित्ताने कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात हा फलक उभारण्यात आला आहे.
![]() |
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी'चा वर्धापनदिन |
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक
कल्याण, कर्जत आणि कसा-याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने येताना अप आणि डाऊन मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार पोहोचविण्यात येत आहेत.
शेखर जोशी
२७ मार्च २०२५
नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित
नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात
डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित
- तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योगात कार्यरत
- ७५ हून अधिक देशांतील युवा नवउद्योजकांचा सहभाग
नेपाळ येथे २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या
जागतिक युवा महोत्सवासाठी सहभागी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीतील नवउद्योजक (नवउद्यमी-स्टार्टअप) मिहिर मुकुंद देसाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देसाई गेल्या तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योग व्यवसायात काम करत आहेत.
नेपाळमधील कावरेपल्लानचोक येथे होणाऱ्या जागतिक युवा महोत्सवासाठी ७५ हून अधिक देशांतील प्रतिभाशाली युवा नवउद्योजक, नवउद्यमी (स्टार्टअप), युवा संशोधक, विद्यार्थी, कलाकार, युवा मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.
या जागतिक युवा महोत्सवातील ‘कृषी आणि अन्न सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक युवा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक समितीचे प्रमुख दीपक कुमार गौतम यांनी मिहिर देसाई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे
देसाई आठ वर्षापूर्वी रशियातील सोची येथे पार पडलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
मिहिर देसाई भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देसाई भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद उर्फ भाई देसाई यांचे चिरंजीव आहेत.
बुधवार, २६ मार्च, २०२५
'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार
- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*
मुंबई, दि. २६ मार्च
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले.
सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन
पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते.
मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला.
९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.
तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.
मंगळवार, २५ मार्च, २०२५
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली
मुंबई, दि. २५ मार्च
हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही.
जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे.
सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...