सोमवार, २१ एप्रिल, २०२५
योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना
शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
लखनऊ, दि. २१ एप्रिल
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे येत्या
१७ ते १९ मे या कालावधीत‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण सोमवारी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल,विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा
हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली.
सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करण्याचे काम सुरू ठेवावे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला
जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे
ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छायाचित्रे पाहताक्षणी ती मेट्रो रेल्वेच्या कामाची आहेत असे वाटेल. पण नाही. ही छायाचित्रे आहेत डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसराला जोडणा-या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जाणाऱ्या अर्धवट बांधकामाची.
ठाकुर्ली उड्डाणपुल नव्याने बांधला तो आत्ता जेवढ्या रुंदीचा आहे त्यापेक्षा अधिक रुंद व मोठा असायला हवा होता. मुळात तो पुढील २५/ ५० वर्षांचा विचार करून बांधायला हवा होता तसा बांधला गेला नाही. पुन्हा काही वर्षांनी तो पाडून नवा बांधण्यासाठीच असा बांधला असावा असा 'अर्थ' असावा.
याच पुलाची एक बाजू ( डोंबिवली पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डावीकडची आणि डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेला येताना उजवीकडची) आज वर्षानुवर्षे तशीच अर्धवट अवस्थेत आहे. ही बाजू ठाकुर्ली पूर्व स्थानकापर्यंत आणण्यात आलेली आहे. आधी असे सांगितले गेले होते की ही बाजू/ उड्डाणपुल थेट पत्रीपुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला आणि कल्याणहून डोंबिवलीला लांबचा फेरा न घेता अवघ्या काही मिनिटांत जाता येईल. पण म्हणे माशी शिंकली. या मार्गात एक वसाहत ( झोपडपट्टी) आडवी येत होती. ती हटविल्याशिवाय पुलाचे बांधकाम पुढे सरकणार नव्हते. अजूनही ती जागा मोकळी झालेली नाही.
हे एक बरे असते. सर्वपक्षीय राजकारण्यांनी गळ्यात गळे घालून रेल्वे मार्गाचा आजुबाजूचा भाग, रेल्वे किंवा शासकीय यंत्रणांच्या मालकीच्या मोकळ्या जागा हेरून तिथे अनधिकृत बांधकामे उभी करायची. इतकी वर्षे झाली म्हणून नंतर ती नियमित करायची. किंवा काही विकास कामे करायची असली की अनधिकृत बांधकामे तोडायला विरोध करायचा, पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून आंदोलने करायची. हे सर्व नीट मार्गी लागले तर ठिक. नाहीतर प्रकल्प रखडला किंवा खर्च वाढला.
ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याणला जाण्याच्या मार्गातील हा अडथळा आता दूर झाला आहे असे म्हणतात. पण तसे झाले असले तरी आता ही अर्धवट राहिलेली बाजू ठाकूर्लीला ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अर्धवट असलेली ही बाजू आधीप्रमाणे कल्याणला पत्रीपुलापर्यंत न्यायची म्हटली तरी ते कठीण होणार आहे. कारण या मार्गात आता ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पुर्व पश्चिम जोडणारा पादचारी पूल व सरकता जिना बांधण्यात आला आहे. त्यामुळे हे बांधकाम आधी पाडावे लागेल. आणि तसे केले तर यावर केलेला खर्च वाया जाईल. आणि म्हणूनच ही बाजू आता ठाकुर्ली ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे, असे म्हणतात.
अर्थात आजच्या ( २१ एप्रिल २०२५) तारखेपर्यंत तरी कामाच्या बाबतीत काही हालचाल असल्याचे दिसले नाही. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या अन्य महत्त्वाच्या कामातून वेळ मिळाला तर कदाचित ते या अनेक वर्षे रखडलेल्या कामात लक्ष घालतील. किंवा कडोंमपाची निवडणूक आली की मतं मिळवण्यासाठी पुन्हा या कामाचे ढोल पिटतील,
आम्ही काहीतरी काम करतोय असे दाखविण्याचे नाटक करतील. बघू या...
शेखर जोशी
२१ एप्रिल २०२५
गुरुवार, १७ एप्रिल, २०२५
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन
पणजी, दि. १७ एप्रिल
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या १७ ते १९ मे
या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय, सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला
याची माहिती देण्यात येणार आहे.
राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर
व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव
आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
- महेश मांजरेकर,अनुपम खेर,भीमराव पांचाळे
काजोल देवगण,मुक्ता बर्वे मानकरी
मुंबई, दि. १७ एप्रिल
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारे व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. पुरस्कारांचे वितरण येत्या २५ एप्रिल रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी
येथे होणार आहे.
या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे याचे स्वरूप आहे्.चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार
अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला असून ६ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे.दोन्ही पुरस्कार अनुक्रमे १० लाख रुपये व ६ लाख या रकमेचे आहेत.
१९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे याचे
स्वरुप आहे.
संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे येत्या
२० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे
ऑफ इंडिया येथे खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य सन्मानिका
शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहेत, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.
परकीय भाषा किंवा संस्कृत सक्तीची करावी, हिंदीची सक्ती नकोच
परकीय भाषा किंवा संस्कृत सक्तीची करावी,हिंदीची सक्ती नकोच
शेखर जोशी
आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाऐवजी 'सीबीएससी' बोर्ड यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असे सांगितले आणि आता पहिलीपासून हिंदीची सक्तीची. हा अट्टहास कशासाठी? पहिलीपासून एखादी भाषा सक्तीचीच करायची असेल तर अन्य एखादी परभाषा सक्तीची करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नोकरी, करिअरसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत भाषाही सक्तीची करता येईल.
महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी तसेच सीबीएससी/ आयसीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीची आहे की करायची याबाबत आपल्या इथे संभ्रमच असतो. सरकार किंवा शिक्षण मंत्री बदलला की या ठिकाणी मराठी सक्तीची केली जाईल, अशी घोषणा नव्याने केली जाते. इंग्रजी माध्यमाच्या किती खासगी शाळा, सीबीएससी/ आयसीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी होते? ज्या संस्था याची अंमलबजावणी करत नाहीत, त्यांच्या विरोधात काय कठोर कारवाई केली जाते? आत्तापर्यंत केली गेली, या शाळांची मान्यता रद्द केली का? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत. आणि त्यात आता हिंदीची सक्ती.
आपल्याकडे आपण मराठी माणसे अनोळखी मराठी माणसाशी- तो मराठी आहे हे कळेपर्यंत हिंदीतच बोलत असतो. अमराठी भाषिकांशीही हिंदीत बोलतो. हिंदी चित्रपट, मालिकांमुळे लहानपणापासूनच आपल्या प्रत्येक मराठी माणसांना हिंदी भाषा मुंबईय्या हिंदीत का होईना पण बोलता येते, कळते, समजते. समोरच्या माणसाचे विचार कळण्यासाठी आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषेची गरज भासते. हिंदी भाषा हे काम पहिल्यापासून महाराष्ट्रात करत आहेच. पुढे एखाद्याला हिंदी भाषा, साहित्य यात गोडी निर्माण झाली तर तो विद्यार्थी, माणूस हिंदी भाषेतील साहित्याची ओळख आपणहून करून घेईल, त्यासाठी हिंदीची सक्ती का?
पहिलीपासून एखादी भाषा सक्तीचीच करायची असेल तर अन्य एखादी परभाषा सक्तीची करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नोकरी, करिअरसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत भाषाही सक्तीची करता येईल. जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी तिची ओळख आहे. विशिष्ट वर्गाची किंवा उच्चवर्णीय लोकांची भाषा असा शिक्का त्यावर मारला गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. म्हणजे जगातील अनेक विद्वानांनी आपल्याकडील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला, त्यावर संशोधन केले, संगणकासाठीही संस्कृत भाषा अधिक योग्य असल्याचे सांगितले आणि आपण मात्र या भाषेचा दुस्वास केला, करत आहोत आणि यापुढेही करत राहू ही खेदाची बाब आहे.
हिंदी भाषा अद्यापही अधिकृतपणे आपली राष्ट्रभाषा होऊ शकलेली नाही. केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजप व मित्रपक्ष सत्तेवर आहेत. जे कॉग्रेसने इतक्या वर्षांत केले नाही, ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने करावे. आज संपूर्ण भारतात हिंदी हिच एकमेव अशी भाषा आहे की ती ९०/९५ टक्के भारतीय नागरिकांना सहज कळते, समजते आणि बोलता येते. दाक्षिणात्य राज्यांचा हिंदी भाषेला असलेला टोकाचा विरोध सोडला तर अन्य राज्यांचा अगदी महाराष्ट्राचाही विरोध नाही. पण म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्तीची करणे आवश्यक नाही, अयोग्य आहे. आपण त्रिभाषा सुत्राचा स्वीकार केला आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील स्थानिक भाषा, नंतर राष्ट्रभाषा/ राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि तिस-या क्रमांकावर इंग्रजी याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहिले जावे.
शेखर जोशी
१७ एप्रिल २०२५
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील बालिका आणि बालक
आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे, १६ एप्रिल
राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई केली जावी, असे आदेश विधान परिषदेच्याउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी दिले.
ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी
उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली. पीडित २० मुली आणि ९ मुले यांच्याशीही संवाद साधला.
या प्रकरणातील पीडित मुली आणि मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली व मुलांना कुठे राहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल,
असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये एकच पत्ता असलेली मुले आढळल्यास, त्या ठिकाणी अवैध बालिका आश्रम आहेत का तसेच 'पसायदान' संस्थेत जिथे पीडित मुले राहत होती तिथे प्रत्येक मुलाचा पत्ता ‘रेल्वे स्टेशन’ असा नमूद असून हे अत्यंत संशयास्पद आहे. ही मुले खरंच स्टेशनवर राहत होती का? की संस्थाचालकांनी मुद्दाम चुकीची माहिती दिली? याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील इतर सामाजिक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या महिन्यात आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू
शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू
ठाणे, १६ एप्रिल
ठाणे जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत असून ही शोधमोहीम येत्या ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे.
शोधमोहिमेत अपात्रठरलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासनाने विहित केलेल्या अर्जाचा नमुना देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी हा अर्ज परिपूर्ण माहिती आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह शिधावाटप दुकानात (रास्त भाव दुकान) सादर करावयाचा आहे.
अर्ज तहसिलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या कुटुंबांच्या शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात येणार आहेत. पडताळणीअंती शासकीय/निमशासकीय कार्यालयातील/खाजगी कंपन्यातील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखांहून जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी/केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द केली जाणार आहे.
शोध मोहिमेदरम्यान मयत, स्थलांतरीत, दुबार नोंद झालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल, तसेच चुकीची अथवा खोटी माहिती व कागदपत्रे दिल्यास संबंधित शिधापत्रिका धारकांविरुध्द योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावा, असे अवाहन ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...