शुक्रवार, १६ मे, २०२५
अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार
अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार
- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार
पोर्ट ब्लेअर, दि. १६ मे
अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शुक्रवारी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली.
ॲड शेलार अंदमान निकोबार दौऱ्यावर असून त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या काळ कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकरप्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत.या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे.याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही विनंतीपत्र लिहिले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या स्मारकाच्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांचे भव्य पुतळे,शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना असल्याचे ॲड. शेलार म्हणाले.
'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात वाहन फेरी
'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी
फोंडा (गोवा), दि. १६ मे
फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून सुरू होणा-या 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्
निमित्ताने शुक्रवारी येथे भव्य वाहनफेरी काढण्यात आली.दुचाकी, चारचाकी आणि बस गाड्यांचा यात समावेश होता.
भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर फोंडा येथील सनातन आश्रमापासून वाहनफेरीला सुरुवात झाली.पुढे कवळे -तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यलय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली. वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज
उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.‘हर हर महादेव’,‘सनातन धर्माचा विजय असो,‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, ही वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी आहे.
महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी तसेच थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट
द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
गुरुवार, १५ मे, २०२५
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई
- पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
ठाणे,दि.१५
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. येत्या ३ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०१३च्या कलम २२३ आणि इतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
बुधवार, १४ मे, २०२५
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी शाळेत प्रथम
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी
शाळेत ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम
डोंबिवली, दि. १४ में
दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून टिळकनगर शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला.
कु.शार्दुल वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दृष्टीदोषाने ग्रासलेला आहे. शार्दुलच्या डोळ्यांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून आता त्याच्या एकाच डोळ्याला दृष्टी आहे. आपल्या दृष्टीदोषावर जिद्दीने, चिकाटीने मात करून अथक परिश्रमाने त्याने हे यश संपादन केले आहे.
स्वबळावर व स्वकर्तृत्वावर परीक्षा देण्याची इच्छा असल्याने दिव्यांग असूनही त्याने परीक्षेसाठी त्यासंदर्भात कोणतीही सवलत घेतली नाही ही बाब विषेश उल्लेखनीय. शार्दुलला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन आयआयटी संगणक अभियांत्रिकीशाखेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे.
पालक आणि शाळेचे शिक्षक यांच्याकडून शार्दुलला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शार्दुलच्या यशाबद्दल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर पालकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- फडणवीस
मुंबईतील मेट्रो लाईन-९ प्रकल्पात
रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- उपमुख्यमंत्री फडणवीस
-ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची तांत्रिक चाचणी यशस्वी
- मिरा-भाईंदर ते पश्चिम- पूर्व उपनगरे आणि
आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रो ९ जोडली जाणार
ठाणे, दि. १४ मे
ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईन ९ प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाईल.ही मेट्रो लाईन पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला असून मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची चाचणी(ट्रायल रन)
यशस्वीरित्या पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए)अध्यक्ष,एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे आणि वेगवान होणार असल्याचे सांगून
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मेट्रोच्या विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळणार असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. तर मेट्रो लाईन-९ मुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येणार असून एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मेट्रो लाईन-९ चा हा पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर दहिसर (पूर्व),पांडुरंगवाडी, मिरा गाव,काशिगाव अशी चार स्थानके आहेत.अंधेरी पश्चिम (लाइन २ बी),घाटकोपर (लाइन १ व ७, लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन २ ए) इथे जाता येणार आहे. तर भविष्यात मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन १०व्दारे ठाणे आणि वसई-विरार (लाइन १३–एनएससीबी स्थानक) जोडली जाणार आहे.
'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा,
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे,प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,
स्थानिक आजी व माजी लोकप्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सोमवार, १२ मे, २०२५
दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर'
हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. १२ मे
दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे यापुढे धोरण राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
ऑपरेशन 'सिंदूर' नंतर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
'ऑपरेशन सिंदूर' संपलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे. निर्दोष, निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर अतिशय निर्घृणपणे गोळ्या घालून मारणे हा दहशतवादाचा बिभत्स, क्रूर चेहरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ऑपरेशन 'सिंदूर' हे फक्त नाव नाही, तर देशाच्या कोट्यवधी नागरिकांच्या भावनेचे प्रतिबिंब, न्यायाची अखंड प्रतिज्ञा असल्याने सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ मे च्या रात्री उशिरा आणि ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने आमच्या या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिले.
दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. रक्त व पाणी एकाच वेळी वाहू दिले जाणार नाही. दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या विषयावरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते. आम्ही आमच्या अटी व शर्तींवरच उत्तर देऊ, असेही पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.
रविवार, ११ मे, २०२५
ठाण्यात 'मॉक ड्रिल'
ठाण्यात 'मॉक ड्रील'
ठाणे, दि. ११ मे
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे येथे रविवारी
आपत्कालीन तयारीची चाचणी घेण्यात आली. ठाण्यातील लोढा अमारा,कोलशेत मैदानावर 'ऑपरेशन अभ्यास' मॉक ड्रिल पार पडले. सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात करण्यात आली.
मॉक ड्रिलच्या दरम्यान काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या चाळीस नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात येऊन त्यांच्यवर प्रथमोपचार करण्यात आले.इमारतीत अडकलेल्या
पाच जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
आजचे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले. मॉक ड्रिल मध्ये महसूल,आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका,आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल,लोढा अमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे,
नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव,तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...