बुधवार, १८ जून, २०२५
ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन
ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखक
मारुती चितमपल्ली यांचे निधन
सोलापूर, दि. १८ जून
ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अलिकडेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वन्यजीव अभ्यासक म्हणूनही त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
चितमपल्ली यांनी वन विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. चितमपल्ली यांनी लिहिलेली 'पक्षी जाय दिगंतरा', 'चकवा चांदणं,' जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात चितमपल्ली यांचा विशेष सहभाग होता. राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती, छत्रपती संभाजीनगरच्या मराठी अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येहही ते सहभागी झाले होते.
'देफ' ना दुसरे शरद पवार होण्याची हौस ती किती?
'देफ' यांचा मास्टर स्ट्रोक!
दुसरे 'शरद पवार' होण्याची हौस ती किती?
शेखर जोशी
आमच्या पक्षात कोणी येणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो. त्यांच्याकडून फक्त हीच अपेक्षा असते की, त्यांनी त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची जी पद्धत असेल ती बाजूला ठेवून आता भारतीय जनता पार्टीच्या नियमांनुसार वागले पाहिजे.
- देवेंद्र फडणवीस
----------------------
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांची ईडी चौकशी सुरू झाली त्या राष्ट्रवादीतील अनेकांना आणि इतरांनाही पक्षात प्रवेश दिला होताच. आता बडगुजर निमित्ताने भविष्यात अशा अनेक 'वाल्यां'ना 'वाल्मिकी' करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. देफ यांचा मास्टर स्ट्रोक! या न्यायाने आता आणखी कोणा कुख्यातांना प्रवेश देणार? यादी तयार असेल ना? 'देफ' हे दुसरे शरद पवार होत चालले आहेत, नव्हे झालेच आहेत.
भाजपच्या स्थानिक पातळीवरील अनेकांचा या प्रवेशला विरोध होता. तो विरोध डावलून, मोडून काढून हा प्रवेश झाला आहे.
अर्थात हे निर्णय देफ एकटे घेत नसणार. मोदी, शहा यांच्याशी चर्चा करूनच वाल्यांना वाल्मिकी करून घेण्यासाठी लाल गालिचा अंथरला जात असणार. 'निष्ठावंतांचे पोतेरे आणि आयारामांसाठी पायघड्या'. आता संजय राऊत यांनाही पक्षात प्रवेश देऊन त्यांनाही त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची पद्धत बदलण्याची संधी जरुर द्यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते
माधव भांडारींसारख्यांना अजूनही विधान परिषदेची उमेदवारी दिली जात नाही. आणि जुना इतिहास व वागण्याची पद्धत बदलण्याची 'प्रविण' असणाऱ्यांना 'प्रसाद' मिळतो.
शेखर जोशी
१८ जून २०२५
-----------------------------
सहा वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २०१९ या दिवशी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता.
https://www.facebook.com/share/p/19BmQ2mNyA/
देवेंद्रू तू दयाळू
पक्षप्रवेश दाता
केले घोटाळे मी
अभय दे आता
पक्षात प्रवेश देऊनी
केले मला तू पावन
जुने सर्व विसरुनी
अपराधांवर घाल पांघरुण
तुझ्याच पावलांशी
लाभली ही स्वस्थता
आता सुटकेचा निश्वास
'ईडी'पासूनही मिळे मुक्तता
'पार्टी विथ डिफरन्स'
तुझे गुणगान गाता
तुझ्यामुळेच मी झालो
'वाल्या'चा वाल्मिकी'आता
©️शेखर जोशी
११ सप्टेंबर २०१९
एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार
एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर
भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार
मुंबई, दि. १८ जून
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर लवकरच भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
व्हॉल्वो कंपनीला एसटीचा लोगो, उत्पन्न देणारे मार्ग, तिकीट सेवा, एसटीचे आगार, थांबे प्रदान करण्यात येणार असून त्या बदल्यात खासगी कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी १० ते १२ टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देण्याचे नियोजन आहे. एसटीच्या ताफ्यात ३० शयनयान आणि ७० आसनी अशा १०० व्हॉल्वो बस दाखल होणार आहेत.
यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द - हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश
पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला
परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द
- हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश
मुंबई, दि. १८ जून
आझाद मैदानात बुधवारी काढण्यात येणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी न दिल्याने हा मोर्चा अखेर निघालाच नाही. मोर्चा रद्द करण्यात आला. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संस्था, संघटनांनी मोर्चास तीव्र विरोध करून मोर्चाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती.
मोर्चा रद्द झाल्याने सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळाले, तर समाजात धार्मिक तेढ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद समर्थक पॅलेस्टाईनप्रेमी गटाचा स्पष्ट पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी मोर्चास परवानगी नाकारली. २०१२ मधील आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. २०१२ मध्ये म्यानमार प्रकरणाच्या निषेधार्थ रझा अकादमीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हिंसक दंगलीत रूपांतरित झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा या मोर्चाच्या माध्यमांतून उदभवण्याची शक्यता होती.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीसह, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, भाजप, शिवसेना (शिंदे गट), हिंदु एकता जागृत समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मानव सेवा प्रतिष्ठान आणि भूमीपूत्र सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे मुंबई पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांची मुख्यालयात भेट घेऊन मोर्चाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली होती. ‘हमास’सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या व हमासच्या हिंसाचारावर मौन बाळगणाऱ्या या मोर्चावर बंदी घालावी, असे या सर्वांचे म्हणणे होते.
मंगळवार, १७ जून, २०२५
‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी
आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी
‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी
मुंबई, दि. १७ जून
मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्या (१८ जून) रोजी मुंबईत आझाद मैदानात निघणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्च्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, संस्था, व्यक्ती यांनी केली आहे.
मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना याविषयी सविस्तर निवेदन देण्यात आले असल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर दंगलीत झाले होते. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस आणि प्रसार माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ला असे प्रकार यावेळी घडले होते, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी 'एक्स' (ट्विटर) या समाज माध्यमातून माहिती दिली असून डाव्या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे स्वरूप एकतर्फी, भारताच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आणि इस्रायलसारख्या मित्र राष्ट्राविरोधात आहे. 'हमास' या दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारावर आंदोलक मौन बाळगतात आणि भारतातील मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचे काम करतात, असा आरोपही समितीने केला आहे.
१८ जून रोजी निघणाऱ्या या मोर्चामुळे मुंबईत पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले या प्रश्नांवर ही आंदोलक मंडळी कधीही रस्त्यावर उतरली नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत
- २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
मुंबई दि. १७
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत दिली.
मराठी निवेदक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात 'आशा रेडिओ गौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट रेडीओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक इत्यादी गटातही पुरस्कार देण्यात येणार असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येणार आहेत. संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करायची आहे. मानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार असून तसेच रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्यांत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी, किस्से यांचेही सादरीकरण होणार आहे.
येत्या २१ जून रोजी नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १६ जून, २०२५
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची शक्यता? - गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा'घडण्याची शक्यता?
-गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने
पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
-देवद ग्रामस्थांकडून सिडकोला निवेदन सादर
पनवेल,दि.१६ जून
सिडकोकडून गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नियोजनातील काही त्रुटींमुळे हा पूल अद्याप सुरू झालेला नाही.त्यामुळे येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. या पुलाचे बांधकाम लवकरच लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 'सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
'सिडको'ने गाढी नदीवर एक नवीन पूल बांधला असून त्यावर आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. नियोजनातील त्रुटींमुळे हा पूल अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे हा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला केलेला नाही. येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. मुळात हा पाईपलाईन पूल वाहनांसाठीचा नाही. पण तरीही नदीवरील या पुलाचा वाहनचालक, पादचाऱ्यांकडून वापर केला जात आहे. ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
अरुंद पाईपलाईन पुलावरील वाहतुकीमुळे नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची भीतीही या निवेदनात व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनाची प्रत 'नैना' चे मुख्य नियोजकार, सिडकोचे मुख्य अभियंता यांनाही देण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...









