शुक्रवार, २० जून, २०२५

पुस्तकात वह्यांची पाने देण्याचा प्रयोग फसला- सुराज्य अभियान

पुस्तकात वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपयांचे नुकसान - सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी मुंबई, दि. १९ जून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुस्तकातच वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपये वाया गेले आहेत. आणि हा निर्णय बदलण्याची वेळ आली असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ने केली आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले असून या चुकीच्या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२३–२४ पासून इयत्ता २ री ते ८ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव पाठ्यपुस्तकांमध्ये काही पाने लिहिण्यासाठी जोडण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही पाने अपुरी ठरली आणि विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच वह्याही घ्याव्या लागल्या. परिणामी दप्तराचे वजन कमी होण्याऐवजी वाढलेच. शिवाय वह्यांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांची जाडी आणि किंमत वाढल्याचे निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हा निर्णय प्रायोगिक स्वरूपात काही शाळांमध्ये अमलात आणून त्याचा आढावा घेतला गेला असता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. शिक्षण क्षेत्रातील निर्णय अभ्यासपूर्वक आणि प्रात्यक्षिक तपासणीच्या आधारे घेणे आवश्यक आहे, हे या घटनेतून अधोरेखित होते, असे मुरकुटे यांनी सांगितले.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मध्ये ७२ कोटी रुपये आणि २०२४–२५ मध्ये ६३.६३ कोटी रुपये, असा एकूण १३५.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागला. २८ जानेवारी २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही’,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवार, १९ जून, २०२५

प्रयोगात्मक कलांच्या अभ्यासासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीत संशोधन केंद्र

प्रयोगात्मक कलांसाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत शाहीर साबळे यांच्या नावाने संशोधन केंद्र - सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आश‍िष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. १९ जून महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड. आश‍िष शेलार यांनी गुरुवारी येथे केली. या केंद्राला शाहीर साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ॲड. शेलार बोलत होते.‌सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे, संबंधित अध‍िकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थ‍ित होते. महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या जढणघडणीचे ऐतहास‍िक संदर्भ दडलेले आहेत. त्यांचा उलगडा करुन संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. त्यासाठी हे संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे ॲड. शेलार म्हणाले.

बुधवार, १८ जून, २०२५

ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन

ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन सोलापूर, दि. १८ जून ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.‌ अलिकडेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.‌ वन्यजीव अभ्यासक म्हणूनही त्यांचे योगदान खूप मोठे आहे. चितमपल्ली यांनी वन विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. चितमपल्ली यांनी लिहिलेली 'पक्षी जाय दिगंतरा', 'चकवा चांदणं,' जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात चितमपल्ली यांचा विशेष सहभाग होता. राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती, छत्रपती संभाजीनगरच्या मराठी अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.‌ अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येहही ते सहभागी झाले होते.

'देफ' ना दुसरे शरद पवार होण्याची हौस ती किती?

'देफ' यांचा मास्टर स्ट्रोक! दुसरे 'शरद पवार' होण्याची हौस ती किती? शेखर जोशी आमच्या पक्षात कोणी येणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो. त्यांच्याकडून फक्त हीच अपेक्षा असते की, त्यांनी त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची जी पद्धत असेल ती बाजूला ठेवून आता भारतीय जनता पार्टीच्या नियमांनुसार वागले पाहिजे. - देवेंद्र फडणवीस ---------------------- भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांची ईडी चौकशी सुरू झाली त्या राष्ट्रवादीतील अनेकांना आणि इतरांनाही पक्षात प्रवेश दिला होताच. आता बडगुजर निमित्ताने भविष्यात अशा अनेक 'वाल्यां'ना 'वाल्मिकी' करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. देफ यांचा मास्टर स्ट्रोक! या न्यायाने आता आणखी कोणा कुख्यातांना प्रवेश देणार? यादी तयार असेल ना? 'देफ' हे दुसरे शरद पवार होत चालले आहेत, नव्हे झालेच आहेत. भाजपच्या स्थानिक पातळीवरील अनेकांचा या प्रवेशला विरोध होता. तो विरोध डावलून, मोडून काढून हा प्रवेश झाला आहे. अर्थात हे निर्णय देफ एकटे घेत नसणार. मोदी, शहा यांच्याशी चर्चा करूनच वाल्यांना वाल्मिकी करून घेण्यासाठी लाल गालिचा अंथरला जात असणार. 'निष्ठावंतांचे पोतेरे आणि आयारामांसाठी पायघड्या'. आता संजय राऊत यांनाही पक्षात प्रवेश देऊन त्यांनाही त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची पद्धत बदलण्याची संधी जरुर द्यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते माधव भांडारींसारख्यांना अजूनही विधान परिषदेची उमेदवारी दिली जात नाही. आणि जुना इतिहास व वागण्याची पद्धत बदलण्याची 'प्रविण' असणाऱ्यांना 'प्रसाद' मिळतो. शेखर जोशी १८ जून २०२५ ----------------------------- सहा वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २०१९ या दिवशी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता. https://www.facebook.com/share/p/19BmQ2mNyA/ देवेंद्रू तू दयाळू पक्षप्रवेश दाता केले घोटाळे मी अभय दे आता पक्षात प्रवेश देऊनी केले मला तू पावन जुने सर्व विसरुनी अपराधांवर घाल पांघरुण तुझ्याच पावलांशी लाभली ही स्वस्थता आता सुटकेचा निश्वास 'ईडी'पासूनही मिळे मुक्तता 'पार्टी विथ डिफरन्स' तुझे गुणगान गाता तुझ्यामुळेच मी झालो 'वाल्या'चा वाल्मिकी'आता ©️शेखर जोशी ११ सप्टेंबर २०१९

एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार

एसटी महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार मुंबई, दि. १८ जून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर लवकरच भाडेतत्त्वावरील खासगी बस चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. व्हॉल्वो कंपनीला एसटीचा लोगो, उत्पन्न देणारे मार्ग, तिकीट सेवा, एसटीचे आगार, थांबे प्रदान करण्यात येणार असून त्या बदल्यात खासगी कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी १० ते १२ टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देण्याचे नियोजन आहे. एसटीच्या ताफ्यात ३० शयनयान आणि ७० आसनी अशा १०० व्हॉल्वो बस दाखल होणार आहेत. यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द - हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मोर्चा रद्द - हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मुंबई, दि. १८ जून आझाद मैदानात बुधवारी काढण्यात येणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी न दिल्याने हा मोर्चा अखेर निघालाच नाही.‌ मोर्चा रद्द करण्यात आला. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संस्था, संघटनांनी मोर्चास तीव्र विरोध करून मोर्चाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. मोर्चा रद्द झाल्याने सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळाले, तर समाजात धार्मिक तेढ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद समर्थक पॅलेस्टाईनप्रेमी गटाचा स्पष्ट पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली. मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी मोर्चास परवानगी नाकारली. २०१२ मधील आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. २०१२ मध्ये म्यानमार प्रकरणाच्या निषेधार्थ रझा अकादमीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हिंसक दंगलीत रूपांतरित झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा या मोर्चाच्या माध्यमांतून उदभवण्याची शक्यता होती. हिंदू राष्ट्र समन्वय समितीसह, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, भाजप, शिवसेना (शिंदे गट), हिंदु एकता जागृत समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मानव सेवा प्रतिष्ठान आणि भूमीपूत्र सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे मुंबई पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांची मुख्यालयात भेट घेऊन मोर्चाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली होती. ‘हमास’सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या व हमासच्या हिंसाचारावर मौन बाळगणाऱ्या या मोर्चावर बंदी घालावी, असे या सर्वांचे म्हणणे होते.

मंगळवार, १७ जून, २०२५

‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी

आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी मुंबई, दि. १७ जून मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्या (१८ जून) रोजी मुंबईत आझाद मैदानात निघणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्च्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, संस्था, व्यक्ती यांनी केली आहे. मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना याविषयी सविस्तर निवेदन देण्यात आले असल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. म्यानमारमध्ये मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर दंगलीत झाले होते. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस आणि प्रसार माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ला असे प्रकार यावेळी घडले होते, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी 'एक्स' (ट्विटर) या समाज माध्यमातून माहिती दिली असून डाव्या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे स्वरूप एकतर्फी, भारताच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आणि इस्रायलसारख्या मित्र राष्ट्राविरोधात आहे. 'हमास' या दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारावर आंदोलक मौन बाळगतात आणि भारतातील मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचे काम करतात, असा आरोपही समितीने केला आहे. १८ जून रोजी निघणाऱ्या या मोर्चामुळे मुंबईत पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले या प्रश्नांवर ही आंदोलक मंडळी कधीही रस्त्यावर उतरली नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.