मंगळवार, ८ जुलै, २०२५
देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा
देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा
- समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांची मागणी
पंढरपूर, दि. ८ जुलै
आषाढीवारी चालू असतांना पुणे येथे वारकर्यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटनांकडून घुसखोरी सुरू आहे. देव, देश, धर्म यांच्यावर सातत्याने आघात घडवून आणले जात असून देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांकडून करण्यात आली.
वारकरी संघटना आणि संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनात ही मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि 'वारकरी व संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमीच वारकर्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.
अधिवेशनात महंत रामगिरी महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि सत्संगप्रमुख दादा वेदक, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट, शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या खटल्यात अडकवून दोन वर्षे कारावास भोगावा लागलेले तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, वारकर्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वरिष्ठ वार्ताहर अजय केळकर, सुदर्शन वाहिनीचे वार्ताहर दीपक चव्हाण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे गणेश लंके यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वारीत होणारी नक्षलवादी, साम्यवादी यांची घुसखोरी या संदर्भात विधान परिषेदत आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा, गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.
गुरुवार, ३ जुलै, २०२५
आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन
आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन
पंढरपूर, दि. ३ जुलै
वारकर्यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात, संघटन आणि अन्य संबंधित प्रश्नांसाठी येत्या ६ जुलै रोजी पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संतांवरील आघात व उपाय यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे.
हिंदू जनजागृती समितीसह वारकरी संप्रदाय आणि संघटना, राष्ट्रीय वारकरी परिषद, श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला, महाराष्ट्र मंदिर महासंघतर्फे आयोजित हे वारकरी अधिवेशन दुपारी एक ते साडेतीन या वेळेत श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण रुग्णालयाच्या शेजारी येथे होणार आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज, सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि हिंदुत्ववादी संस्था/ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र, छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.
पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध केला जावा, गोहत्या आणि गो तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी इत्यादी मागण्यांवर अधिवेशनात चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
धर्मरक्षणार्थ कार्य करणाऱ्या धर्मरक्षकांचा अधिवेशनात गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी वारकरी-भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - राजन बुणगे ९७६२७२१३०४
मंगळवार, १ जुलै, २०२५
'हम' संस्थेकडून जम्मू काश्मीर येथील ११२ युद्धग्रस्तांना २५ लाखांची आर्थिक मदत
डोंबिवलीच्या 'हम' संस्थेकडून जम्मू काश्मीर येथील
११२ युद्धग्रस्तांना २५ लाखांची आर्थिक मदत
डोंबिवली, १ जुलै
'जोडो काश्मिर' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या डोंबिवलीच्या 'हम चॅरिटेबल ट्रस्ट' ने जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील ११२ युद्धग्रस्त नागरिकांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कालबद्ध आखणी आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळे अवघ्या महिनाभरात निधी संकलन आणि वाटप दोन्ही गोष्टी पार पडल्या.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या दरम्यान जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील नागरिकांना तोफगोळे, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स याच्या माऱ्याला सामोरे जावे लागले. यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 'हम' कार्यकर्त्यांची एक तुकडी जम्मूला गेली होती. जम्मूतील राजौरी पूंछ, नौशेरा तर काश्मीर मधील उरी, लगामा आणि सलमाबाद भागाला त्यांनी भेट दिली.
या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार होता. 'हम'ने त्याचा आराखडा तयार केला आणि ४ जून रोजी डोंबिवली येथे जाहीर कार्यक्रम घेऊन या निधीसाठी 'देणे राष्ट्राचे' म्हणून आवाहन करण्यात आले. कल्याण, भांडुप येथेही जाहीर कार्यक्रम झाले. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जम्मू काश्मीर मधील नागरिकांसाठी डोंबिवली, मुंबई शहर आणि उपनगरे, पुणे, ठाणे, भिवंडी , तसेच बेंगलोर, हैदराबाद अशा विविध भागातून आर्थिक मदत जमा झाली. अमेरिका, कॅनडातील भारतीयांनी सुद्धा या संकल्पाला हातभार लावला.
हम ट्रस्टच्या पेमेंट लिंकमुळे आर्थिक मदत एका क्लिकवर करणे सहज शक्य झाले. यासाठी अक्षय फाटक यांचे बहुमोल सहकार्य लाभले. देणगीची रक्कम किमान १०१ रुपये ते कमाल ५ लाख रुपये अशी होती. संकेत ओक यांनी जम्मू काश्मीर मधील परिस्थितीच्या चित्रणाची ध्वनिचित्र तयार करून समाज माध्यमातून प्रसारित केली. अवघ्या वीस दिवसांत 'हम' चे विश्वस्त, कार्यकर्ते, हितचिंतक आणि देणगीदार यांच्या अथक प्रयत्नातून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.
जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील आपदग्रस्तांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी 'हम'च्या विश्वस्तांनी 'हम' चे संस्थापक सदस्य मनोज नशिराबादकर यांच्या सल्ल्याने व प्रत्यक्ष पाहणी करून आराखडा तयार होता. त्यानुसार ९० कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत देण्यात तर ज्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा २२ जणांना 'हम' च्या विश्वस्तांनी प्रत्यक्ष भेटून धनादेशाद्वारे ही मदत केली. 'हम'चे संस्थापक सदस्य मनोज नशिराबादकर यांच्यासह 'हम'चे विश्वस्त जयंत पित्रे, सुनिल देशपांडे उपस्थित होते. एकूण ११२ कुटुंबांना ही आर्थिक मदत देण्यात आली.
'हम' चँरीटेबल ट्रस्ट निमित्तमात्र आहे. लोकसहभागातून आणि नियोजित कालावधीत संकल्प पूर्ण केल्याचे समाधान आणि आनंद आम्हाला आहे. देणगीदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळ 'जोडो जम्मू काश्मीर' हा उद्देश पूर्ण झाला, असे 'हम'चे अध्यक्ष सुनिल देशपांडे, विश्वस्त जयंत पित्रे यांनी सांगितले.
मंगळवार, २४ जून, २०२५
आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले
आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला
सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले
- महापालिकेतील तत्कालिन सत्ताधारी
दोन्ही काँग्रेसने आपलाच हट्ट पूर्ण केला
शेखर जोशी
डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाट्यगृहाला डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार पु. भा. भावे यांचे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी तत्कालिन एकसंघ शिवसेना व भाजप यांनी केली होती. सर्वसामान्य रसिकांनाही तसे वाटत होते.
पण तेव्हा कडोंमपात सत्तेवर असलेल्या कॉग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ती मागणी डावलली आणि नाट्यगृहाला हट्टाने सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, महापालिकेच्या एखाद्या शाळेला, शैक्षणिक संस्थेला त्यांचे नाव दिले असते तर ते योग्य ठरले असते. नाट्यगृहाला त्यांचे नाव देणे अप्रस्तुतच होते. पण तेव्हा महापालिकेतील दोन्ही काँग्रेसनी आपला हट्ट कायम ठेवला आणि पु. भा. भावे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव नाही म्हणजे नाही देऊ दिले.
'भावे' या नावाची दोन्ही काँग्रेसला जर ॲलर्जी होती तर बहुजन समाजातील पण नाट्य क्षेत्रातीलच लेखक, नाटककार, अभिनेता, अभिनेत्री यांचे नाव का नाही दिले? अभिनेते अरुण सरनाईक या नावाचा पर्यायही पुढे आला होता असे आठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीही तेव्हा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान उपटले नाहीत किंवा सावित्रीबाई फुले हे नाव नको, असा आदेशही दिला नाही. पवार यांनी मनात आणले असते तर कॉग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलून ते सावित्रीबाई फुले हे नाव देणे अगदी सहज टाळू शकले असते, पण त्यांनी सोयिस्कर मौन बाळगले. आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला अखेर सावित्रीबाई फुले यांचेच नाव दिले गेले. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकसंघ शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले पुंडलिक म्हात्रे तेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर होते.
शरद पवार यांचे हे असेच आहे. त्यांना एखादी गोष्ट घडून यावी असे वाटते तेव्हा ते सक्रिय होतात. आपल्या पाठिराख्यांना सर्व पातळ्यांवर कामाला लावतात आणि त्यांना जे हवे आहे ते घडवून आणतात. आणि त्यांच्या मनातच नसले, एखादी गोष्ट घडायला नको असे ते ठरवतात तेव्हा मी त्या गावचाच नाही, असे म्हणत निष्क्रिय राहतात. याचा अनुभव आजपर्यंत वेळोवेळी महाराष्ट्राने घेतला आहे.
शेखर जोशी
२४ जून २०२५
खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान
खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान
आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान
शेखर जोशी
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यासाठी खासगी एफएम रेडिओच्या जॉकींना मानाचे पान आणि आकाशवाणीच्या रेडिओ जॉकींचा मात्र अपमान असे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी निवड करण्यात आलेले सर्व रेडिओ जॉकी खासगी एफएम रेडिओ चे होते, आकाशवाणी मुंबई, विविध भारती किंवा आकाशवाणी एफएम रेडिओच्या जॉकींना यात डावलून एका प्रकारे आकाशवाणी मुंबईचाच अपमान करण्यात आला.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रेडिओचे आपल्या सर्वांच्याच भावविश्वात मानवाचे स्थान आहे. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे आकाशवाणीचे घोषवाक्य आहे. आजवर हजारो, लाखो विविध कार्यक्रम, गाणी आकाशवाणी ने सादर केली. अनेक गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, अन्य कलाकार आकाशवाणीने घडविले. आकाशवाणीच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि
आशा रेडिओ पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम व पुरस्कार सुरू केल्याबद्दल ॲड. शेलार यांचे अभिनंदन. पण झाला प्रकार मात्र खटकणारा.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
खरेतर आकाशवाणी मुंबई केंद्र या सर्व खासगी एफएम रेडिओंचा जन्मदाता. रेडिओ प्रसारणातील 'भीष्म पितामह'. भारतातील पहिले रेडिओ प्रसारण मुंबईतून, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या माध्यमातून २३ जुलै १९२७ या दिवशी सुरू झाले. आकाशवाणी मुंबईसह विविध भारतीने अनेक उत्तमोत्तम निवेदक महाराष्ट्राला दिले. आता आकाशवाणी मुंबईची एफएम रेडिओ स्टेशनही आहेत. यापैकी निवृत्त झालेल्या किंवा विद्यमान असलेल्या निवेदकांपैकी एकाही निवेदकाला मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलाविण्यात आले नाही? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
मुलाखतीच्या कार्यक्रमात एक/दोन रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठीतून प्रश्न विचारले, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठीतून उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या नावात 'महाराष्ट्र' असे नाव असताना हिंदीचे लटांबर का होते? मुंबईत राहून या रेडिओ जॉकींना फक्त एक प्रश्न मराठीतच का विचारता आला नाही? त्यासाठी हिंदीचा वापर का केला? दाखविण्यासाठी तरी का होईना या रेडिओ जॉकींनी मराठीत प्रश्न विचारावा, असे वाटले नाही. मुलाखत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सूत्रसंचालकांनी सहा रेडिओ जॉकी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात पॅनेल डिस्कशन आहे असे सांगितले. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार तत्काळ आसनावरून उठून व्यासपीठावर गेले आणि हे पॅनेल डिस्कशन नाही तर रेडिओ जॉकी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत हे स्पष्ट केले. हा प्रकारही हास्यास्पद होता.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी ज्या खासगी एफएम रेडिओ जॉकींची निवड करण्यात आली होती त्याच खासगी एफएम रेडिओंनी मराठी गाणी डाऊन मार्केट आहेत असे सांगून आपल्या खासगी एफएम रेडिओवरून ती प्रसारित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यावेळी मनसेने आवाज उठविल्यानंतर खासगी एफएम रेडिओवर काही वेळ मराठी गाण्यांच्या प्रसारासाठी देण्यात आला. पण बहुदा अजूनही मुंबईतील काही खासगी एफएम रेडिओचा अपवाद वगळता अन्य खासगी एफएम रेडिओवर मराठी गाणी प्रसारित होत नाहीत आणि होत असतील तर तोंडी लावण्यापुरतीच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या मुलाखत कार्यक्रमात ही बाब ठळकपणे दाखवून द्यायला हवी होती.
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
आकाशवाणी मुंबई केंद्राचे पूर्वीचे मुंबई ब केंद्र आणि आत्ताची अस्मिता वाहिनी, विविध भारती यांच्या योगदाची दखल घेऊन या पहिल्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात 'आकाशवाणी मुंबई'चा विशेष पुरस्कार देऊन सन्मान सन्मान करण्यात आला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ज्येष्ठ निवृत्त निवेदकांचाही विशेष सन्मान करायला हवा होता. पुढील वर्षी (२३ जुलै २०२६) आकाशवाणी मुंबई केंद्र ९९ व्या वर्षांत पदार्पण करेल. त्यामुळे पुढील वर्षीच्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात तरी आकाशवाणी मुंबईचा योग्य तो सन्मान होईल अशी अपेक्षा आहे.
शेखर जोशी
२४ जून २०२५
शेजो उवाच
https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3
शनिवार, २१ जून, २०२५
तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही
तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि
वारीचा अवमान सहन करणार नाही
- समस्त वारकरी संप्रदाय व संघटनांचा इशारा
पुणे, दि. २१ जून
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सध्या काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत. वारकरी संप्रदाय व संघटना हा अवमान सहन करणार नाही, असा इशारा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकरी संत आणि मान्यवरांनी दिला.
समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसतेच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह ज्यांच्यावर शहरी नक्षलवादाच्या गुन्ह्यांची नोंद आहे, असे इतर पुरोगामी वारीत शिरले आहेत. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही कराडकर यांनी केली.
नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
देहूप्रमाणे वारकर्यांची सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, असे ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम असल्याचे ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले. संत, महापुरुष यांवर टिका करणार्यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा, अशी मागणी ह.भ.प. राम महाराज कदम यांनी केली. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या
रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २१ जून
रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध एफएम रेडिओ वाहिन्यांच्या सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका
आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते.
लहानपणी दिवसाची सुरूवात रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. 'विविध भारती' वरील सकाळची गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळला गेलो. रेडिओचे महत्व पूर्वीपासून असून आजही ते अबाधीत आहे.
रेडिओ हे समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी या मुलाखतीत रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणी लिहिणे आदी छंदाविषयीही सांगितले. शीघ्र कविता करत फडणवीस यांनी गाणेही गायले.
या कार्यक्रमात आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला.
आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटीला, आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना देण्यात आला. यासह अन्य १२ गटात रेडिओ पुरस्कार देण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...









