बुधवार, ३० जुलै, २०२५
ऑनलाईन जुगारावरील नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी
ऑनलाईन जुगारावरील नियंत्रणासाठी
राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी
मुंबई, दि. ३० जुलै
देशभरात झपाट्याने वाढणार्या ऑनलाईन जुगारामुळे (‘रिअल मनी गेमिंग’मुळे) लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. काही हजार कोटी रुपयांची लुट होत आहे. यावर केवळ राज्यात कायदा करणे पुरेसे नसून राष्ट्रीय स्तरावर कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.
सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रीय स्तरावरील कायदा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २५२ अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
छत्तीसगडमध्ये हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वा. सावरकारंचे नातू
रणजीत सावरकर, सर्वश्री गोविंद साहू, रोहित तिरंगा, हेमंत कानस्कर आणि इतर सदस्य उपस्थित होते तर गोवा राज्यात ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री राजेंद्र देसाई, नारायण नाडकर्णी, मनोज गावकर, सुचेंद्र अग्नी, स्वप्नील नाईक, सत्यविजय नाईक आणि सदाशिव धोंड यांचा समावेश होता.
जुगाराच्या ॲप्स आस्थापनाकडे
२५ हजार कोटी रुपयांची थकबाकी
देशपातळीवर अनेक चित्रपट अभिनेते या ऑनलाईन
जुगाराची जाहिरात करतात. २०२५ या वर्षात ५० कोटींपेक्षा अधिक भारतीय ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन जुगार चालवणारी अनेक आस्थापने विदेशी असून हा सर्व पैसा विदेशात जात असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जी.एस.टी.) बुडवल्याच्या प्रकरणी सरकारने ऑनलाइन जुगार चालवणार्या आस्थापनांना ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली आहे. त्यात केवळ ‘ड्रीम इलेव्हन’ची २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऑनलाईन जुगाराच्या विरोधात देशातील केवळ आसाम, तेलंगाणा, आंधप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनी कायदे केले आहेत; मात्र राज्यांनी केलेले कायदे अपुरे पडत असून तमिळनाडूतील कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. एकूणच राज्यनिहाय कायदे अपुरे ठरत असल्याने राष्ट्रव्यापी कठोर कायदा हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.
मंगळवार, २९ जुलै, २०२५
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे चीनार पुस्तक महोत्सव
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे
चीनार पुस्तक महोत्सव
श्रीनगर, दि. २९ जुलै
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) येत्या २ ते १० ऑगस्ट दरम्यान श्रीनगर येथे चीनार पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून हा महोत्सव शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात (एसकेआयसीसी) येथे होणार आहे.
शारदा लिपीविषयक प्रदर्शन, काश्मीरी, गोजरी, डोगरी आणि अन्य स्थानिक बोलीभाषांवर चर्चा, बदलत्या काळानुसार साहित्य, करोनानंतर डिजिटल युगात कथाकथनाचे बदलते स्वरूप, साहित्य लेखन, प्रकाशन आणि वाचन यावर पुस्तक महोत्सवात चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, काव्यवाचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रेते, प्रकाशक, लेखकांचाही सहभाग असणार आहे.
राज्य शासनाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता/सेवक पुरस्कार जाहीर
राज्य शासनाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि
उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता/सेवक पुरस्कार जाहीर
- येत्या १२ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण
मुंबई, दि २९ जुलै
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना दिल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
२०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट
ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहेत.
शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे एक लाख ते २५ हजार रुपये, ग्रामीण भागासाठी ७५हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना जाहीर झाले असून पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये अशी आहे.
विभागस्तरावर पाच जणांना पुरस्कार जाहीर झाले असून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहेत. रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
येत्या १२ ऑगस्ट रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट मुंबई येथे एका कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
पुरस्कार पुढीलप्रमाणे
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग
सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे
सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक
ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ
शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक
ग्रामीण विभाग
स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव
बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम
प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
श्रध्दा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी
विभागस्तरीय पुरस्कार
अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमान नगर, अकोला, ता.जि. अकोला.
छत्रपती संभाजीनगर: श्री. खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली.
नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौध्दवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे
पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार*
अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा
छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर
नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया
नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक
पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा.
मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग
बुधवार, २३ जुलै, २०२५
'अर्पण' सांगितिक मैफलीत १७५ शिष्यांचे बासरी वादन
'अर्पण'सांगितिक मैफलीत १७५ शिष्यांचे बासरी वादन
ठाणे, दि. २३ जुलै
ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने येत्या २७ जुलै रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता ‘अर्पण’ या सांगितीक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानच्या १७५ बासरीवादक शिष्यांचे सामूहिक बासरीवादन होणार आहे.
ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुरूंप्रती कृतज्ञता, संगीताप्रती समर्पण आणि संस्कृतीप्रती आदर या उद्देशाने ‘अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे यंदा १३ वे वर्ष असून यावेळी पं. विवेक सोनार यांचेही बासरी वादन होणार आहे.
कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार
लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'!
'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार
मुंबई, दि. २३ जुलै
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात त्याची आणि तिची नजरानजर होते आणि सुरू होतो दोघांचेही आयुष्य बदलणारा प्रवास. त्या दोघांची ही गोष्ट 'मुंबई लोकल' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या विशेष उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन व सादरीकरण करण्यात आले. अभिनेता प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिजीत यांनी केले असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो 'मुंबई लोकल' प्रवासात एकमेकांना पाहतात. प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा कंदील मिळतो. पण पुढे त्यांच्या आयुष्यात जे घडते ते चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत.
बुधवार, ९ जुलै, २०२५
सोनदरा गुरुकुलात श्री सत्यवृक्ष महापूजा आणि व्रताचा शुभारंभ
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोनदरा गुरुकुलात
श्री सत्यवृक्ष महापूजा आणि व्रताचा शुभारंभ
शेखर जोशी
डोंबिवली, दि. ९ जुलै
बीड जिल्ह्यातील डोमरी येथील दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचालित सोनदरा गुरुकुलात उद्या (१० जुलै) गुरुपौर्णिमा आणि संस्थेच्या ३९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्री सत्यवृक्ष महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी श्री सत्यवृक्ष व्रताचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. श्री सत्यवृक्ष व्रत हा आगळावेगळा उपक्रम गुरुकुलातील निवासी कार्यकर्ते महेश खरे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.
२१ जुलै १९८६ रोजी नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून व त्यांचे सहकारी कृष्णा दामोदर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डोमरी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुदाम भोंडवे या तरुणाने सोनदरा गुरुकुल ही शैक्षणिक संस्था सुरु केली. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्येवर उपाय म्हणून हे गुरुकुल बालाघाटाच्या डोंगर उतारावर सुरु झाले. डोंबिवलीकर महेश खरे आणि त्यांच्या पत्नी पूनम हे दोघेही गेल्या दीड वर्षापासून सोनदरा गुरुकुलात निवासी कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.
निसर्गाची बेसुमार हानी ही सध्याची गंभीर समस्या असून ती सोडवण्यासाठी टाकलेले पाऊल म्हणजे श्री सत्यवृक्ष व्रत असून या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग जतन, संरक्षण आणि संवर्धनाचा प्रयत्न केला जाणार आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता सोनदरा गुरुकुलाच्या कदंबवन शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम होणार असल्याचे उपक्रमाचे संकल्पनाकार महेश खरे यांनी सांगितले.
गुरुवारी होणा-या कार्यक्रमात श्री सत्यवृक्ष व्रतात रुद्राक्ष वृक्षाची विधिवत पूजा केली जाणार आहे. पूजा झाल्यावर निसर्ग, पर्यावरण जतन व संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना याविषयीच्या माहितीचे कथा/अध्याय स्वरूपात वाचन केले जाणार असून 'निसर्ग आरती'ने श्री सत्यवृक्ष व्रता/पूजेची सांगता होणार आहे. पूजा केलेला रुद्राक्ष वृक्ष तसेच राहुरी कृषी विद्यापीठातून आणलेल्या आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील आराध्य वृक्षांची जी रोपे तयार केली आहेत त्यांचेही रोपण संकुलातील आवारात केले जाणार आहे. गुरुकुलातील विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षी सुमारे साडेचारशे झाडांची लागवड देवराई पद्धतीने कदंबवन परिसरात करण्यात आली होती. गेले वर्षभर विद्यार्थ्यांनी त्यांची देखभाल केली असून यापैकी पाच झाडांचा वाढदिवस प्रातिनिधिक स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या झाडांची पूजा व औक्षण केले जाणार असल्याची माहितीही खरे यांनी दिली.
भारतीय संस्कृतीत अनेक रुढी-परंपरा असून धर्म आणि रूढींच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी समाजात रूढ केल्या गेल्या. सध्या आपल्यासमोर प्रदुषण, वृक्षतोड, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, कचऱ्याचे अव्यवस्थापन अशा पर्यावरणविषयक अनेक समस्या आहेत. समाजातील श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालून हे नवे ‘सत्यवृक्ष’ व्रत / पूजा तयार करण्यात आली आहे. या व्रतामुळे वृक्षपुजन, वृक्षसंवर्धन आणि सर्व जीवांसह निसर्गस्नेह हे संस्कार होणे अपेक्षित असून हे व्रत व्यक्तिशः, समुहाने वा संस्थात्मक पातळीवर कोणीही करू शकेल, असे खरे म्हणाले.
या आगळ्या कार्यक्रमासाठी निसर्ग व पर्यावरणप्रेमी नागरिक, विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुलाचे अध्यक्ष अनिल लोखंडे, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, सचिव अश्विन भोंडवे यांनी केले आहे.
--पूर्ण--
मंगळवार, ८ जुलै, २०२५
देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा
देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा
- समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांची मागणी
पंढरपूर, दि. ८ जुलै
आषाढीवारी चालू असतांना पुणे येथे वारकर्यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटनांकडून घुसखोरी सुरू आहे. देव, देश, धर्म यांच्यावर सातत्याने आघात घडवून आणले जात असून देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांकडून करण्यात आली.
वारकरी संघटना आणि संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनात ही मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि 'वारकरी व संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमीच वारकर्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.
अधिवेशनात महंत रामगिरी महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि सत्संगप्रमुख दादा वेदक, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट, शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या खटल्यात अडकवून दोन वर्षे कारावास भोगावा लागलेले तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, वारकर्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वरिष्ठ वार्ताहर अजय केळकर, सुदर्शन वाहिनीचे वार्ताहर दीपक चव्हाण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे गणेश लंके यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वारीत होणारी नक्षलवादी, साम्यवादी यांची घुसखोरी या संदर्भात विधान परिषेदत आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा, गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...