मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी मिंधे कोण झाले?
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाठा गटाचे 'उत' आलेले खासदार, प्रवक्ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे म्हणून करत असतात. पण खरे मिंधे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी त्यांनीच मिंधेगिरी केली.
महाविकास आघाडी आणि गद्दारी या शब्दाचे जनक, मूळपुरुष शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडली. त्याआधी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, त्यांचे सरकार पाडून, आमदार फोडून म्हणजे गद्दारांना बरोबर घेऊन ते मुख्यमंत्री झाले होते. असो.
तर याच शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे छगन भुजबळ आणि अन्य काही आमदार फोडले. पवार तेव्हा कॉंग्रेस आय पक्षात असल्याने त्यांनी या सर्वांना कॉंग्रेस आय पक्षात प्रवेश दिला. याच गद्दार भुजबळ यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, पुढे उपमुख्यमंत्रीपद दिले.
भुजबळ यांचे शिवसेनेतून अशा प्रकारे बाहेर पडणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागले. ठाकरे आणि शिवसेनेकडून भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' या शेलक्या शब्दात केला जायचा. भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला होता. पुढे याच भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली.
हा सर्व इतिहास माहित असताना, ज्या शरद पवार यांनी शिवसेना फोडली, ज्या गद्दार भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली, ज्या भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांची 'टी बाळू' अशी टिंगल टवाळी केली त्या पवार, भुजबळ यांच्याशी, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, गद्दार भुजबळ यांच्यासोबत अडीच वर्षे काम केले. मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी ही मिंधेगिरी नाही तर काय होते?
मला मुख्यमंत्री करणार असाल तर गद्दार भुजबळ मंत्रीमंडळात नको, अशी भूमिका का घेतली नाही? ( शरद पवार यांनी तुमचे म्हणणे मान्य केले असते किंवा नसते हा नंतरचा प्रश्न) किमान तसे जाहीरपणे एकदाही का बोलला नाहीत? भुजबळांना मंत्रीमंडळात घेणार असाल तर मला मुख्यमंत्रीपद नको, अशी भूमिका का घेतली नाही? आपण असे बोललो आणि शरद पवार यांनी ते मान्य केले तर हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागेल, अशी भीती वाटली आणि मिंधेपणा पत्करून एकदाचे मुख्यमंत्रीपदावर बसलात.
शेखर जोशी
२२ जून २०२३