गुरुवार, ५ जून, २०२५
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
इगतपुरी, दि. ५ जून
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, शांताराम भोईर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार
-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. ५ जून
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यात येतील, अशी घोषणा कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल. त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.’एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन असल्याचेही कोकाटे म्हणाले.
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र १० कोटी वृक्ष लागवड- मुख्यमंत्री फडणवीस
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत
महाराष्ट्र १० कोटी वृक्ष लागवड- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ५ जून
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत फडणवीस बोलत होते.
महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी व ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्ष लागवडीकडे लक्ष ठेवताना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा आणि सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी या बैठकीला उपस्थित होते.
पूररेषेच्या आतील बांधकामे हटवा- मुख्यमंत्री फडणवीस
पूररेषेच्या आतील बांधकामे हटवा- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ५ जून
नदी काठची पूररेषा केवळ खूण म्हणून न ओळखता पूररेषेच्या आत अतिक्रमण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अतिक्रमणांची मोजणी करून पूररेषेच्या आत आलेली बांधकामे हटविण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत फडणवीस यांनी हे आदेश दिले.
आपत्ती व्यवस्थापनाचा निधी सौम्यीकरण कामासाठी खर्च व्हावा.
तसेच पावसानंतर नुकसान झालेले रस्ते, बंधारे, वीजवाहिन्या दुरुस्ती कामासाठीही या निधीचा उपयोग करावा, अशा सूचनाही फडणवीस यांनी बैठकीत केल्या.
बुधवार, ४ जून, २०२५
शैक्षणिक खरेदी सक्तीच्या लूटमारीला जळगाव जिल्ह्यात लगाम!
शैक्षणिक खरेदी सक्तीच्या लूटमारीला जळगाव जिल्ह्यात लगाम!
विशिष्ट दुकानातूनच खरेदीच्या सक्ती विरोधात
जळगाव जिल्हा शिक्षणाधिका-यांचे आदेश
सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्याला यश
जळगाव, दि. ४ जून
विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्याच्या खरेदीविरोधात सुराज्य अभियानने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जळगाव जिल्हा शिक्षणाधिका-यांनी अशा सक्ती विरोधात आदेश दिला असून या आदेशाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात व्हावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानने केली आहे.
राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणी होत असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो. हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा सक्तीविरोधात स्पष्ट आदेश दिले असून हा आदेश केवळ जळगावपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण राज्यभरात लागू करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्यावतीने महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे माधव सावळानी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव येथील पद्मालय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर, अधिवक्ता निरंजन चौधरी, माहिती अधिकार कार्यकर्ते नरेंद्र सपकाळे, समितीचे गजानन तांबट उपस्थित होते.
विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करु नये असा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या आदेशामुळे कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांनी विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती करता येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांची निवड करून कुठल्याही दुकानातून साहित्य घेण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार अशा सक्तीला कायदेशीर मान्यता नाही. जळगाव जिल्ह्यातील निर्णय नक्कीच स्वागतार्ह असल्याचे सुराज्य अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.
मार्च २०२५ मध्ये सुराज्य अभियानाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन संपूर्ण राज्यात असे आदेश लागू करण्याची मागणी केली होती. यावर शिक्षणमंत्र्यांनी प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यावर पुढे काय कार्यवाही झाली,? हे शासनाने जाहीर करावे, अशी सक्ती करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करून गरज असल्यास शाळेची मान्यता रद्द करावी, तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक व ई-मेल सुविधा सुरू करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत 'स्मार्ट लायब्ररी''
ठाणे, दि. ४ जून
ठाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये २८ स्मार्ट ग्रंथालये उभारण्यात आली आहेत. भिवंडी, कल्याण तसेच शहापूर या तालुक्यांतील ग्रामपंचातींचा यात समावेश आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही ग्रंथालये उभारण्यात आली आहेत.विविध विषयांवरील तब्बल २ हजारांहून अधिक पुस्तकांसह ऑडिओबुक्स, स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय इत्यादी सुविधाही या ग्रंथालयात देण्यात आल्या आहेत.
लहान मुलांसाठी कॉमिक्स, बोधकथापर पुस्तके, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरित्र ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तके इथे वाचायला मिळणार आहेत.
ग्रंथालयात सर्व गटातील वाचकांना विनामूल्य प्रवेश आहे.
रविवार, १ जून, २०२५
अकरावी ऑनलाईन प्रवेश; १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत रविवारी
संध्याकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, दि. १ – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत
रविवारी संध्याकाळी सहापर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल,असे
सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल,‘करीअर पाथ’ चा टॅब
तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांकही संकेत स्थळावर देण्यात आले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)