गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक शेजो उवाच- २ आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम
- रस्ता व चौक नामफलक महिनाभर घेणार मोकळा श्वास शेखर जोशी डोंबिवली, दि. १६ डिसेंबर राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी घोषणा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठीही येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या चेहेफलकबाजीला तात्पुरता विराम मिळणार आहे. त्यामुळे रस्ता व चौक नामफलक एक महिनाभर तरी मोकळा श्वास घेतील. सर्वपक्षीय राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्ता व चौक नामफलक आपल्याच वडिलांचे आहेत, या जागा आपली वैयक्तिक मालमत्ता आहे, असे वाटते. त्यामुळे कोणताही विचार न करता ही मंडळी रस्ता व चौकांचे नामफलक झाकून बिनधास्त चेहरे फलकबाजी करतात.‌ कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन व संबंधित अधिकारी यांचा यावर कोणताही वचक नसल्याने, संबंधितांना या बेकायदा फलकबाजीसाठी कोणताही दंड ठोठावला जात नसल्याने ही मंडळी चेहरेफलकबाजी करण्यासाठी सोकावली होती.
ज्या स्थानिक महनीय व्यक्तींची किंवा राज्य/ राष्ट्रीय स्तरावरील महापुरुषांची नावे रस्ता किंवा चौकाला देण्यात आली आहेत, ते नामफलक झाकून राजकीय मंडळी चेहरेफलकबाजी करत आहेत. वाढदिवस, अभिनंदन, निवड/ नियुक्ती, सण/ उत्सव शुभेच्छा इत्यादी प्रकारच्या चेहरे फलकबाजीचा यात समावेश आहे. समाज माध्यमातून यासंदर्भात वेळोवेळी लिहिले गेले, टीका केली गेली. या चेहरेफलकबाजीमुळे शहर विद्रुप, बकाल होते हे माहित असूनही लाज सोडलेली ही मंडळी वर्षानुवर्षे चेहरेफलकबाजी वसा घेतल्याप्रमाणे करत आहेत.‌ रस्ता व चौक नामफलक झाकून केली जाणारी ही चेहरेफलकबाजी कायमची बंद झाली पाहिजे. 'नोटा' चा वापर करून चेहरेफलकबाजीचा निषेध करा कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, उमेदवार मतं मागायला घरी येतील तेव्हा निवडून आल्यानंतर मी फलकबाजी करणार नाही, कोणाला करू देणार नाही आणि कोणी केली तर मी तातडीने कारवाई करेन, असे लेखी हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्याची गरज आहे. रस्ता व चौक नामफलक झाकून चेहरे फलकबाजी करणा-यांना मत नाही. 'नोटा' चा वापर करून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त झाला पाहिजे. शेखर जोशी १६ डिसेंबर २०२५

रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे... मीटर सक्ती नाही तर मत नाही

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६ शेजो उवाच- ३ रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे... मीटर सक्ती नाही तर मत नाही डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा मीटर सक्ती नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करत अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहेत. स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह कोणताही राजकीय पक्ष, नेते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस या मनमानीला आजपर्यंत आळा घालू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू आहे. बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर दोन किलोमीटर आहे. त्यामुळे नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी ३५ रुपये आकारणे अपेक्षित आहे. पण या अंतरासाठी ६०/ ७० रुपये घेतात. याच अंतरासाठी रात्री बारा वाजल्यानंतरचे भाडे ४४ रुपये आहे. भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर २.०९ किलोमीटर आहे. नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी दिवसा आणि रात्री बारा वाजल्यानंतर अनुक्रमे ५० आणि ६३ रुपये भाडे आकारले पाहिजे. मात्र रिक्षा चालकांकडून दिवसाच १२० रुपये आकारले जातात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणी प्रवासी तिथून येणार असेल तर अर्थात १५० पेक्षाही जास्त (किती ते त्या रिक्षाचालकावर अवलंबून) पैसे मागितले जातात. अशी ही मनमानी गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथून बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व येथे येण्यासाठी रिक्षा पकडली. आणि शेअर पद्धतीने प्रवासी आला तरी रिक्षा चालकांकडून प्रत्येक प्रवासी ३० रुपये घेतले जातात. रिक्षात मागे ३ आणि पुढे एक/ दोन प्रवासी बसवले जातात.‌ खरे तर हे ही बेकायदा आहे. हे अंतर दोन किलोमीटर आहे. मीटर टाकले तर या अंतरासाठी ३५ रुपये होतात. म्हणजे रिक्षात वेगवेगळे प्रवासी बसले तरी प्रत्येकी तीन प्रवासी बसवले तर प्रत्येकी १२ रुपये आणि चार प्रवासी बसवले तर १० रुपयेच घेतले पाहिजेत. कल्याण डोंबिवली महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवलीकर/ कल्याणकर नागरिकांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. मतं मागायला येणारे सर्वपक्षीय उमेदवार आणि राज्य व स्थानिक पातळीवरील सत्ताधारी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेते, स्थानिक पदाधिकारी, नेते यांना रिक्षा मीटर सक्तीची अंमलबजावणी न झाल्याप्रकरणी जाब विचारला पाहिजे. रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदार नाही किंवा 'नोटा' चा वापर अशी भूमिका घेतली पाहिजे. हीच संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. शेखर जोशी १७ डिसेंबर २०२५

कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे..

कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे... 'रिक्षा मीटरसक्ती नाही तर मतदान नाही' कडोंमपा निवडणूक २०२६ शेजो उवाच - ४ शेखर जोशी डोंबिवली- कल्याणमध्ये रिक्षा चालक मालक संघटना आणि काही मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन बससेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. अपवाद फक्त बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते एमआयडीसी निवासी विभाग. प्रचंड प्रतिसादात ही बससेवा सुरू आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि मुजोर रिक्षाचालकांचा विरोध मोडून कडोंमपाची परिवहन बससेवा सक्षमपणे सुरू करण्याची गरज आहे. डोंबिवली आणि कल्याण दोन्ही शहरे प्रचंड प्रमाणात विस्तारली असून नागरिकांना घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर जाण्यासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत जास्तीत जास्त मार्गांवर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहनची बससेवा सुरू झाली पाहिजे. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व ते रेल्वे स्थानक, डोंबिवली पूर्व अशी कडोंमपाची परिवहन सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र रिक्षा चालक मालक संघटना, रिक्षाचालकांच्या दबावामुळे ती रद्द करण्यात आली. काही मुजोर रिक्षाचालकांनी या बसवर दगडफेक केली होती. डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानक ते महापालिका ह प्रभावक्षेत्र कार्यालय अशी परिवहन सेवा आहे. मात्र ती नावाला, शोभेला असल्याने असून नसल्यासारखीच आहे. जेमतेम एखादा प्रवासी असतो किंवा नसतो.‌ बसमध्ये चालक, वाहकच असतात. ही बस चालविण्याचे नाटक कशासाठी? परिवहन सेवा सुरू झाली तर आमच्या पोटावर पाय येतो, असे रिक्षाचालक म्हणतात. मुळात हा दावा खोडसाळ व चुकीचा आहे. एक बस गेल्यावर पुढची बस येण्यासाठी पंधरा, वीस मिनिटांचा अवधी असेल तर ज्या प्रवाशांना थांबायचे आहे ते थांबतील. इतर प्रवासी रिक्षाचाच आधार घेतील. ठाण्यात, मुंबईत महापालिका परिवहन सेवा चालविली जातेच ना? डोंबिवली कल्याणमध्ये मुठभर रिक्षाचालकांचा कळवळा आणि हजारो प्रवाशांकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती आहे. डोंबिवली व कल्याण दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर खरे तर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या बस उभ्या राहिल्या पाहिजेत. परिवहन सेवेचे बसथांबे असले पाहिजेत, त्याला प्राधान्य हवे. दोन्ही ठिकाणी उलट चित्र आहे. बाहेर पडल्यानंतर रिक्षातळ आहेत. डोंबिवली पूर्व भागात तर बाहेर पडल्यानंतर चार/ सहा वेगवेगळे रिक्षातळ आहेत. या रिक्षातळावरील रिक्षा शेअर पद्धतीने अमूकच ठिकाणी जाणार, दुसऱ्या रिक्षातळावरील रिक्षा तमूक ठिकाणी जाणार. हे कशासाठी? हा प्रकार बंद झाला पाहिजे. डोंबिवली पश्चिम भागाचा विचार केला तर जेमतेम कोपर रस्ता, पं. दीनदयाळ रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा फुले रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता आणि गणेश नगर, राजू नगर- बावनचाळ मार्गे जाणारा रस्ता इतके प्रमुख रस्ते आहेत. या सर्व मार्गांवर सुरुवात ते शेवट आणि तसेच उलट बाजूने शेवट ते सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा सुरू केली तर प्रचंड प्रतिसाद मिळेल. पण आजपर्यंत डोंबिवली पश्चिमेला महापालिका परिवहन सेवा सुरू झालेली नाही. कल्याण डोंबिवलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी रिक्षा चालक मालक संघटना आणि रिक्षा चालकांपुढे अक्षरशः नांगी टाकली आहे. त्यामुळे इथे रिक्षा मीटर सक्ती होऊ शकली नाही. मुद्रीत किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाज माध्यमातून बातम्या आल्या की थातुरमातुर कारवाईचे नाटक पार पाडले जाते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आता संधी आहे. मतं मागायला घरी येणारे सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेते यांना जाब विचारण्याची आवश्यकता आहे. रिक्षा मीटरसक्ती नाही, सक्षम परिवहन सेवा नाही, तर मतदान नाही किंवा निषेध म्हणून 'नोटा' चा वापर, केला पाहिजे. शेखर जोशी १८ डिसेंबर २०२५

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा!

'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा! शेखर जोशी शुक्रवारी सकाळी गुहागरहून गुहागर- भांडूप एसटीबसने येताना हे दोन्ही आजोबा महाडला बसमध्ये चढले. डावीकडे बसलेले हिरामण नागोठणेकर , उजवीकडे उभे असलेले नामदेव जाधव. दोघांची वये अनुक्रमे ८५ आणि ९०. एसटी पूर्ण भरलेली होती. वाहकाला आपली आधार कार्ड दाखवून दोघेही जण कोणतीही तक्रार न करता शांतपणे उभे राहिले. दोघांना नागोठणे येथे जायचे होते. मात्र बस नागोठणे आगारात जाणार नसल्याने आधी काही अंतरावर उतरुन दोघेही वेगळ्या बसने किंवा अन्य जे मिळेल त्या वाहनाने घरी पोहोचणार होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने महाड येथे कीर्तन/ भजन सप्ताहासाठी हे दोन्ही आजोबा गेले होते. बराच वेळ ते दोघे शांतपणे उभे होते. बसमधील एक प्रवासी माणगावला उतरणार आहेत, तिथे जागा होईल असे वाहकांने त्यांना सांगितले होते. त्यामुळे नागोठणेकर आजोबा थोडे पुढे गेले. माझ्या जागेवर बसा थोडा वेळ असे जाधव आजोबांना सांगून मी माझ्याजागेवरून उठलो. तर जाधव आजोबा चार पावले पुढे गेले आणि उभ्या असलेल्या नागोठणेकर आजोबांना मागे आसनावर येऊन बसायला सांगितले आणि ते उभे राहिले. नागोठणेकर आजोबा आसनावर येऊन बसल्यावर त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. ते म्हणाले, खरे तर माझ्यापेक्षा जाधव वयाने पाच वर्षांनी मोठे नव्वदीचे आहेत. तुम्ही तुमच्या जागेवर त्यांना बसण्यासाठी सांगितले पण ते स्वतः न बसता त्यांनी मला बसायला सांगितले. का ते माहीतेय? मी नाही अशी मान हलवली. काही वर्षांपूर्वी माझी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे आणि म्हणून ते स्वतः उभे राहिले आणि मला बसायला दिले, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले‌. खरोखरच धन्य आहे. माझ्या जागेवर नागोठणेकर आजोबांना बसायला दिल्यामुळे मी त्यांच्या शेजारीच उभा होतो. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा झाल्या. दरम्यान जाधव आजोबांनाही माणगावला बसायला जागा मिळाली. नागोठणेकर आजोबा एसटीतच नोकरीला होते. आम्ही दोघेही जण आसपासच्या परिसरात जिथे कुठे कीर्तन, भजन, नामसप्ताह असेल तिथे अधूनमधून येत जात असतो. आपल्या धर्मात त्या त्या वयानुसार जी आश्रम व्यवस्था/ दिनचर्या सांगितली आहे त्यानुसार आम्ही दोघेही आता वानप्रस्थाश्रमाच्याही पुढील व्यवस्थेत म्हणजे संन्यास आश्रमात आहोत. संसारातील सर्व बंधनातून मुक्त होऊन/ त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी पूर्णपणे देवाप्रती लिन होणे, घराबाहेर/ गावाबाहेर राहून, सातत्याने भ्रमण करणे, संसारातील सर्व सुख दुःखापासून अलिप्त राहून देवाचे नामस्मरण करणे या संन्यासाश्रमात सांगितले आहे. आणि आम्ही तेच करतो आहोत, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले‌. हे सांगताना आम्ही कुणीतरी वेगळे आहोत, आम्ही काही जगावेगळे करत आहोत, असा कोणताही आव/ अभिनिवेश अजिबात नव्हता. अर्धा तास झाल्यावर नागोठणेकर आजोबा उठून उभे राहायला लागले आणि मला म्हणाले तुम्ही तुमच्या जागेवर बसा, त्यावर आता तुमचे उतरायचे ठिकाण येईपर्यंत तुम्हीच बसा, असे मी त्यांना म्हटले. त्यांना बसतानाही संकोचल्यासारखे झाले होते. इतरवेळी लोकल/ लांब पल्ल्याच्या गाडीत जो अनुभव आपण घेतो त्या पार्श्वभूमीवर हा वेगळा अनुभव होता. या वयात तुम्ही दोघेही फिरता, सर्वच ठिकाणी राहण्याची/ जेवणाखाण्याची चांगली व्यवस्था होत असेलच असे नाही, मग याचा त्रास होत नाही का? यावर आजवर देवाने भरपूर दिले आहे‌. सुखी आहे. आता जे आयुष्य राहिले आहे ते सर्व देवाचे कोणाबद्दल, कशाहीबद्दल कसलीही तक्रार करायची नाही. देवाने आजचा दिवस छान घालवला तसा उद्याचाही दिवस छान जाईल, यावर विश्वास ठेवून तो जसा ठेवेल तसे राहायचे, असे उत्तर त्यांनी दिले. नागोठणे यायच्या आधी जिथे या दोन्ही आजोबांना उतरायचे होते, ते ठिकाण आले. वाहकाने आवाज दिला आणि दोघेही त्या थांब्यावर उतरले. उतरण्याआधी मी या दोघांही 'कर्मयोग्यां'च्या पाया पडलो, त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा भेटीचा योग येईल तेव्हा भेटू या, असे म्हणत या नागोठणेकर, जाधव आजोबांचा निरोप घेतला. शेखर जोशी ८ डिसेंबर २०२५ छायाचित्रात डावीकडून नागोठणेकर आजोबा, जाधव आजोबा‌.

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

नवी दिल्लीत तीन दिवसांचा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम्‌’ (इंद्रप्रस्थ) येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत होणाऱ्या महोत्सवात 'स्वराज्याचा शौर्यनाद’ या नावाचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉल क्रमांक १२ मध्ये असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक शस्त्रे मांडण्यात येणार आहेत. तसेच मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्रेही असतील.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला प्रदर्शनात असणार आहे‌. महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्धपरंपरा, धातूशास्त्र, ‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्रनिर्मिती प्रक्रिया याचेही दर्शन घडणार असल्याची माहिती वर्तक यांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराजांसह अनेक संत-महंत महोत्सवास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहनही वर्तक यांनी केले.

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल!

दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल! शेखर जोशी गुहागर, दि. ६ डिसेंबर 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले' असे म्हणतात, याची प्रचिती येथे रसिकांना आली. रत्नागिरीतील पाच कलाकारांनी तालसुरांची अप्रतिम मैफल गुहागर येथे रंगविली. निमित्त होते दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमाचे.
मूळचे गुहागरवासीय असलेले आणि गेल्या काही वर्षांपासून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गुहागराबाहेर पडलेले जोशी कुटुंबीय दरवर्षी गुहागर येथील 'ब्रह्मचैतन्य' या आपल्या निवासस्थानी येऊन दत्तजयंती उत्सव गेली काही वर्षे साजरा करत आहेत. या उत्सवासाठी माहेरवाशिणींसह सर्व जोशी कुटुंबीय एकत्र जमतात. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यापैकी हा एक कार्यक्रम बुधवारी झाला. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत 'ब्रह्मचैतन्य' वास्तूत हे सर्व कार्यक्रम पार पडले.
प्रसन्न जोशी (बासरी), उदय गोखले (व्हायोलिन), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), निखिल वझे (तबला), हरिश केळकर ( तालवाद्ये) हे कलाकार सहभागी झाले होते. सर्वच कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केले. स्वर/शब्दांशिवाय या सर्वांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी वाद्यांच्या साथीने सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात 'हंसध्वनी' राग सादरीकरणाने झाली. आणि त्यांनतर सर्व कलाकारांनी वाद्यवादनाच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची उत्तम व अद्ययावत ध्वनीव्यवस्था गुहागरच्याच निखिल ओक यांची होती‌. निघालो घेऊन दत्ताची पालखी, केव्हा तरी पहाटे, लग जा गले, लाजून हासणे, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, तोच चंद्रमा नभात, ह्दयी प्रीत जागते, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, थकले रे नंदलाला, अबीर गुलाल उधळीत रंग, नीज माझ्या नंदलाला, बाजे मुरलिया इत्यादी मराठी, हिंदी गाणी सादर केली आणि उत्तरोत्तर कार्यक्रम चढत्या श्रेणीत रंगत गेला. आता आम्ही जी गाणी सादर करणार आहोत ती तुम्ही ओळखा, असे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोखले यांनी सांगितले आणि रसिकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. त्यामुळे व्यासपीठावरील वादक कलाकार आणि रसिक प्रेक्षकांत आपसूकच भावबंध निर्माण झाला व रसिक कार्यक्रमात गुंतत गेले. काही गाण्यांची तर केवळ सुरुवात झाल्यानंतर लगेचच गाण्याचे शब्द काय आहेत, ते रसिक सांगत होते. अवीट गोडीची ही सर्वच गाणी रसिकांच्या हृदयात कोरली गेली असून या गाण्यांचे रसिकांच्या मनावर असलेले गारुड अद्यापही कायम आहे‌, याचेच प्रत्यंतर कार्यक्रमप्रसंगी पाहायला मिळाले. कलाकार एकेक गाणे सादर करताहेत आणि सर्व रसिक त्यावर गाणे गाताहेत, असेही पाहायला मिळाले.‌ 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' भैरवीने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम औपचारिकपणे संपला असला तरी रसिकांच्या मनात कलाकारांनी सादर केलेल्या तालसुरांचा नाद गुंजत राहिला. उदय जोशी, गणेश जोशी बंधूंनी वादक कलाकारांचा यथोचित सन्मान केला.
दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी सकाळी काकड आरती, फेर धरणे, नामस्मरण, भजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. सत्यनारायण पूजेसह औदुंबराच्या वृक्षाखालील पादुकांवर अभिषेक, दत्त नामावली याचाही यात समावेश होता. गणेश जोशी यांनी दुपारी बाराच्या सुमारास गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय - अवतरणिका वाचन केले.
संध्याकाळी सौ. स्मिता जोशी यांनी दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन सादर केले. त्यांना अनंता आणि श्रीराम वैशंपायन बंधूंनी अनुक्रमे ऑर्गन व तबल्याची संगीतसाथ केली. यावेळी जोशी कुटुंबातील महिलांनी दत्त जन्माचा पाळणाही सादर केला.
दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित अन्य कार्यक्रमात कीर्तनकार शिल्पा पटवर्धन यांचे सीतेवरील आख्यान/कीर्तन सोबतच विभावरी नेवरेकर, कल्याणी मेहेंदळे यांनी गाण्यांवर सादर केलेले कथ्थक नृत्य, सायंप्रार्थना, दुर्गादेवी देवळात गोंधळ, तन्वी दामले यांचा भक्तीगीत, नाट्यगीत मैफलीचा समावेश होता. ही संगीत मैफलही छान रंगली. मित्रवर्य अजय जोशीमुळे दत्तजन्मोत्सवात सहभागी होता आले आणि अन्यही सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता आला. गुहागरवासीय विक्रम खरे यांच्या सुग्रास भोजन/नाश्ता व्यवस्थेने हा आनंद आणखी द्विगुणित झाला.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?

डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती! - महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार? शेखर जोशी भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे‌. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो. नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे.‌ अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‌ भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात छायां अन्य कुर्वन्ति:, तिष्ठन्ति स्वयं आतपे:, फलान्यपि परार्थाय: वृक्षाः सत्पुरुषा इव: असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता. ' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे.‌ भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे. या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला.‌ झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी. शेखर जोशी २६ नोव्हेंबर २०२६ 👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही भाग