सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज शेखर जोशी दहीहंडी, गणपती, नवरात्र या सर्व उत्सवातील पावित्र्य, मांगल्य लोप पावले आहे. हे उत्सव आता इव्हेंट झाले असून सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यावर कब्जा केला आहे. गल्ली ते राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांसाठी तो मनी, मसल पॉवरचा खेळ झाला आहे. या सर्व उत्सवांचे झालेले विकृतीकरण आणि बाजारीकरण थांबविण्यासाठी आता 'एक प्रभाग एक गणपती' ही काळाची गरज बनली आहे. कटू वाटला तरी लोकानूनय न करता कठोरात कठोर निर्णय घेऊन ते कागदावर न राहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, ते पाहिले पाहिजे.‌ फटाके, डीजे, लेझर बंदी फक्त कागदावरच राहिली असून नियम, कायदा धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने सर्व काही सुरू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही मंडळ असो ती मिरवणूक रात्री दहा वाजता संपलीच पाहिजे. फटाके, डीजे, लेझर बंदी म्हणजे बंदीच हवी. जी मंडळे याचे उल्लंघन करतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मंडळाला जबरदस्त आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. किमान एक तरी उदाहरण समोर आले तर कदाचित या बेबंद वागण्याला आळा बसेल.
उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, रस्ते अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अचकट विचकट गाणी, अश्लील नृत्य, छातीत धडकी भरेल आणि कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजातील डीजे, लेझर दिवे म्हणजेच गणपती उत्सव हे रूढ होत चालले आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकींना वेळेचे बंधन, भान जराही राहिलेले नाही. निवासी परिसर, रुग्णालये परिसरातही छातीत धडकी भरेल आणि कानठळ्या बसतील अशा आवाजात मिरवणूक काढली जाते. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, ही गोष्ट मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही जाणवत असणारच. पण आमचे कोणी, काही वाकडे करू शकत नाही, अशा माजात वर्षानुवर्षे हे सुरू आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सवाचे विकृतीकरण, बाजारीकरण झाले आहे.‌ सण/ उत्सवातील हे बाजारीकरण, विकृतीकरण, मनी व मसल पॉवरची स्पर्धा म्हणजे हिंदुत्व, असे केले म्हणजेच सण/ उत्सव साजरे करणे नाही, सुजाण, सुसंस्कृत आणि सारासार विचार करण्यारे याच्याशी नक्कीच सहमत असतील.
खरे तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अर्थात हे स्वप्नच आहे. निगरगट्ट आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते हे कधीच होऊ देणार नाही. 'पार्टी विथ डिफरन्स' असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या भाजपने, मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनी तरी किमान एक वर्ष तरी आपापल्या कार्यक्षेत्रात, मतदार संघात, शहरात 'एक प्रभाग एक गणपती' हा उपक्रम राबवून दाखवावा.‌
खरे तर घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणपती मूर्तीची उंची अनुक्रमे दोन फूट आणि पाच इतकीच असली पाहिजे. रस्ते अडवून, पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून सार्वजनिक दहीहंडी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंदच झाले पाहिजेत. 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. प्रभागातील शाळा, महाविद्यालय किंवा खासगी सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली की हे करणे सहज शक्य आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी तळमळ, आच असायला हवी. लोकानुनय न करता कटू निर्णय घेऊन ते राबविण्याची धमक आणि त्याला पाठिंबा देण्याची तयारी अनुक्रमे सत्ताधारी आणि विरोधकांनी दाखवली पाहिजे. अर्थात निगरगट्ट आणि कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ही अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच आहे. शेखर जोशी ८ सप्टेंबर २०२५

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप!

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप! - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक डोंबिवली, दि. ७ सप्टेंबर डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या ७६ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता शनिवारी झाली. यंदाच्या वर्षी उत्सवातील सर्व जबाबदाऱ्या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी बाप्पांच्या विसर्जनापूर्वी सामूहिक श्री अथर्वशीर्षाचे पठण करण्याचे मंडळाने ठरविले होते. त्यानुसार ताई पिंगळे चौकात मिरवणूक पोहोचल्यावर मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भाविकांनी अथर्वशीर्षाचे पठण केले.
मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते.‌ ढोल पथके, किंवा डी जे, गुलाल, फटाके यापैकी कोणत्याच गोष्टीचा समावेश हा टिळकनगरच्या विसर्जन मिरवणुकीत कधीच नसतो. पारंपरिक पद्धतीने निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची पालखीत विराजमान झालेली मूर्ती, त्यापुढे असणारे लेझीम पथक, ढोल आणि हलगी वाजवणारे मंडळाचेच कार्यकर्ते आणि त्यापुढे लेझीम, झांज खेळणारे, झेंडे नाचवणारे नागरिक असे या मिरवणुकीचे स्वरूप असते. यंदाच्या वर्षी तब्बल ५२ लहान मुलामुलींचे पथक या मिरवणुकीत होते. त्यांनी साकारलेले मानवी मनोरे पाहून सर्वच नागरिक थक्क झाले.‌
मंडळातर्फे उत्सव काळात श्री गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, श्री विष्णु सहस्रनामाचे पठण, श्री सत्यनारायण पूजा, कोकणातल्या सुप्रसिद्ध आरत्या, भोवत्या आणि ७६ पदार्थांचा अन्नकोट इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मूळचे डोंबिवलीकर असलेले प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे गेली २४ वर्षे गणेशोत्सवासाठी भव्य सजावट/ देखावे साकारत आहेत.‌ यूनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे दर्शन यंदा घडविले.

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट

जागतिक वारसा यादीतील बारा किल्ल्यांच्या सजावटीतून छत्रपती शिवरायांना मानवंदना - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा 'युनेस्को'ने अलिकडेच जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ७६ व्या वर्षांत या १२ किल्ल्यांची सजावट साकारली आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय शशिकांत धबडे यांनी सलग २५ व्या वर्षी टिळकनगर गणेशोत्सवातील भव्य, नेत्रदीपक सजावट साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या लष्करी भूदृश्यांची ओळख, माहिती सर्वांना करून देण्याच्या उद्देशाने ही सजावट केली आहे.‌ किल्ल्याच्या १२ दरवाज्यातून १२ किल्ले दिसतील अशी ही सजावट आहे. मुळचे डोंबिवलीकर असलेले धबडे गेली २४ वर्षे मुंबईतून किंवा कोणत्याही दौऱ्यावर असल्यास तिथून डोंबिवलीत स्वतः उपस्थित राहून सहका-यांच्या मदतीने टिळकनगर गणेशोत्सव मंडळासाठी भव्य देखावे साकारत आहेत.
शेजो उवाच https://youtu.be/gbolRCWRhL8

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव

'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि. २६ ऑगस्ट दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या गणेशोत्सवाचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. मात्र पहिला गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये साजरा झाला. २९ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाट्यप्रयोग सादर होणार आहे.‌ मुक्ता बर्वे यांच्यासह अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे हे कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.‌ १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी यांचा ‘संकर्षण via स्पृहा’ हा कार्यक्रम होणार आहे.‌ गणेशोत्सवातील अन्य कार्यक्रम ३० ऑगस्ट, ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर. ३१ ऑगस्ट ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे. ३ सप्टेंबर पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांनी सुमधुर गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’. ५ सप्टेंबर २०२५ वारकरी कीर्तन – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर दिला जाणार आहे. ब्राह्मण सेवा मंडळ, भवानीशंकर मार्ग, दादर पश्चिम येथे होणा-या या सर्व कार्यक्रमाची वेळ रात्री आठ अशी आहे.

रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय

रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय - राज्यातील महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' संकल्पना राबविण्याची गरज शेखर जोशी रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त न्यासाचे यंदा १०४ वे वर्ष असून रोह्यातील 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना स्तुत्य, कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 'एक गाव एक गणपती' नव्हे तर 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे आणि खरोखरच मनावर घेतले तर ही गोष्ट अशक्य नाही. रस्ते अडवून, पादचारी आणि वाहन चालक यांना अडथळा होईल असा मंडप न उभारता शहरातील बंदिस्त सभागृहात हा गणेशोत्सव साजरा केला जावा, ती काळाची गरज आहे. अर्थात हे करण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती हवी. केवळ आणि केवळ लोकानुनयाला बळी न पडता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन, चर्चा करून 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हिच गोष्ट सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिहंडी उत्सवाच्या बाबतीतही करता येईल.
स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने तरी भाजपची सत्ता असलेल्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रात किंवा भाजपचे नगरसेवक असलेल्या किमान एका तरी प्रभागात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत आणि इतर राजकीय पक्षापुढे एक नवा मापदंड व आदर्श निर्माण करावा. मनसेचे राज ठाकरेही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या गप्पा करत असतात. त्यांनीही किमान दादर भागात, ते राहतात त्या प्रभागात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' साठी प्रयत्न करावेत.
गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ ( शिवसेना एकसंघ असताना) यांनी काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता होती. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनाचा वारसा सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनावर घेतले असते आणि शुभा राऊळ यांना पाठिंबा दिला असता तर कदाचित ही गोष्ट घडून गेली असती. पण उद्धव ठाकरे यांनी ती हिंमत दाखवली नाही. पुरोगामी असलेल्या आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा जप करणाऱ्या शरद पवार यांनी तरी बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची राजकीय ताकद असलेल्या किमान एका तरी गावात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबवून दाखवावी.

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर - गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळाकडे कल्याण, दिनांक,२६ ऑगस्ट शास्त्रीय संगीत, गायनाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कल्याणमधील गायन समाजाला सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा शताब्दी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अलीकडेच कल्याण गायन समाजाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष असून गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळा कडे आहे पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणार आहे. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक प्रा. डाॅ. नरेशचंद्र, शताब्दी पुरस्कार समिती न्यायासाचे चिटणीस डाॅ. रत्नाकर फाटक, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, श्रीकांत जोशी, भालचंद्र जोशी, मुयरेश आगलावे हे संचालक, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रती, संस्थांना प्रेरणा म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवातर्फे शताब्दी पुरस्कार दिला जातो. शताब्दी वर्षात झालेल्या २५ हजार रूपयांच्या निधी संकलनातून जमा झालेली रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेऊन त्यात देणगीदारांनी दिलेल्या देणगीची भर घालून त्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी होणार आहे. सुभेदार वाडा गणेशोत्सवात यंदा 'शिव साम्राज्य' ही संकल्पना घेऊन सजावट करण्यात येणार असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सुभेदार वाड्याच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या महालाचे नेपथ्य केले आहे. २८ ऑगस्ट रोजी पांडुरंग बलकवडे यांचे 'शिवरायांची अष्टक्रांती' या विषयावर व्याख्यान होणार असून ३० ऑगस्ट रोजी मावळा बोर्ड गेमच्या निर्मात्यांशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. १ सप्टेंबर रोजी युवा शाहीर रामानंद उगले यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणी' हा कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमांची वेळ रात्री साडेआठ अशी आहे. ४ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता 'कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार' वितरण सोहळा व अचला वाघ यांचे 'शिवकालीन स्त्रिया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर शेखर जोशी रस्ते आणि चौकांच्या नावांच्या पाट्या झाकून फलकबाजी करण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पटाईत आहेत.‌ अधूनमधून या मंडळींना असे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रुप होत असल्याचा साक्षात्कार होतो आणि या सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' चे नाटक सुरू होते. प्रसार माध्यमातून ही मंडळी कठोर इशारे देतात आणि कार्यकर्ते, पदाधिकारीही 'मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर ' असे समजून तिकडे साफ दुर्लक्ष करतात. अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रूप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्या मतदान करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे छायाचित्र असलेले फलक लागले असतील तर ते काढून टाका आणि ते लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ही बातमी रविवारच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या आधीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे आदेश दिले होते. पण काही फरक पडलेला नाही. असे अनधिकृत फलक लावणारे, रस्ते, चौकांचे नामफलक झाकून त्यावर आपले चेहरे फलक लावणारे राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्त आर्थिक दंड होत नाही तोपर्यंत ही फलकबाजी अशीच सुरू राहणार आहे. किमान एक तरी प्रकरणी अशी कठोर कारवाई झाली तर आणि तरच या प्रकाराला आळा बसेल. सर्वसामान्य नागरिकांना जे दिसते ते महापालिका प्रशासन, महापालिका अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांना दिसत नसेल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. डोंबिवली पश्चिमेत नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील ( पंजाब नॅशनल बँक/आरबीएल बॅंक चौक) सुभाष रस्ता, महर्षी कर्वे रस्ता नावांच्या पाट्यांवर सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची फलकबाजी सुरू आहे. मध्यंतरी वेळोवेळी याची छायाचित्रे काढून समाज माध्यमातून प्रसारित करत होतो. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष 'एक्स' (ट्विटर) वेधून घेतले होते. मात्र काहीही फरक पडलेला नाही. निर्लज्ज आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्ता व चौक नामफलक झाकून आपले चेहरे फलक बिनदिक्कतपणे लावत आहेत. हे सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासारख्या निर्लज्जपणा, कोडगेपणा मला करता येत नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फलकबाजीच्या विरोधात समाज माध्यमातून छायाचित्रे प्रसारित करणे बंद केले आहे. अशीच परिस्थिती डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, आयआरबीचे म्हैसकर यांच्या नावाचा चौक, घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी मॉल चौक येथे आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींसह भाजपचे पदाधिकारी यांची छायाचित्रे असलेल्या मोठ्या कमानी डोंबिवलीभर लावण्यात आल्या आहेत. या कमानीवर सर्व मिळून साठ/ सत्तरहून अधिक स्टॅम्पसाईज फोटो आहेत. या कमानी अधिकृत असतीलही. पण या कमानींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दोन ते अडीच फूट जागा अडवली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपच्या या कमानी आता नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अशाच कायम असतील. अनेक रस्ते अरुंद असल्याने या कमानींमुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. पण सत्ताधारी भाजपकडूनच हे होत असल्याने महापालिका प्रशासनही तिकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल आणि विद्रुप करणा-यांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करू नका, हे अजित पवार यांनी केलेले आवाहन योग्यच आहे. मतदारांनी ते खरोखरच मनावर घ्यावे आणि मतदान करताना 'नोटा' वापरून आपला निषेध व्यक्त करावा. ©️शेखर जोशी