शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा
मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
सातारा, दि. २ जानेवारी
तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा किंवा धर्माचा असला तरी हरकत नाही, पण त्याचा दांडा मराठीच असला पाहिजे. खांद्यावर पालखी कोणाचीही असो तिचा गोंडा मराठीच असायला हवा, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे अध्यक्षीय भाषणात केले.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लेखक/कवीला कोणतीही जात नसते, मात्र, त्याला धर्म असतो आणि तो म्हणजे फक्त मानवता धर्म. जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकाही साहित्यिकांनी पेलली असल्याचेही पाटील म्हणाले.
धान्य पिकविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा आणि मातेचा गौरव करण्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना सुरू करावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केल्या.
अन्य भाषांची सक्ती करणे अयोग्य- डॉ. भवाळकर
साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. भवाळकर म्हणाल्या, प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नका. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे. आणि हे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगते आहे.
ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केला.
गोदावरीकाठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाड चालणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत. झाडे टिकली तरच आपली पुढची पिढी जगेल.
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची- फडणवीस
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको. भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे’, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली होती. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांनी उपरोक्त भूमिका मांडली.
इंग्रजी, फ्रेंच जर्मन अशा परदेशी भाषांना आपण पायघड्या घालतो; परंतु भारतीय भाषांना मात्र विरोध करतो. ही भूमिका योग्य नाही. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याचवेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा
राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक
विजेत्या एकांकिकांची 'चतुरंग सवाई' स्पर्धा
- ३, ४ जानेवारीला प्रवेश अर्ज स्वीकारणार
- १०, ११ जानेवारीला प्राथमिक फेरी
- २५ जानेवारीला अंतिम फेरी
मुंबई, दि. २ जानेवारी
नाट्यक्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात.
चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेचे यंदा ३७ वे वर्ष असून स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठीचे प्रवेश अर्ज येत्या
३ आणि ४ जानेवारी २०२६ या दोन दिवसातच स्वीकारले जाणार आहेत.
प्राथमिक फेरी येत्या १० आणि ११ जानेवारी रोजी होणार असून प्राथमिक फेरीतून निवडण्यात येणाऱ्या सात एकांकिकांची अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
स्पर्धेचे पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसहित येत्या तीन आणि चार जानेवारी रोजी दुपारी चार ते आठ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी /ई, माहीमकर बिल्डिंग, बांगडवाडी, गिरगाव, मुंबई- ४००००४ येथे स्वीकारले जाणार आहेत.
सवाई एकांकिकेचे माहितीपत्रक, नियमावली, प्रवेश अर्जासाठी संबंधितांनी chaturang1974@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.
गुरुवार, १ जानेवारी, २०२६
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'!
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष
विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'!
सातारा, दि. १ जानेवारी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संमेलनासाठी सातारा दाखल होण्यापूर्वी पुणे, सातारा, सांगली येथील साहित्यिकांच्या निवासस्थानी आणि स्मारकाला भेट दिली. सातारा येथे आजपासून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांच्या या भेटीमध्ये विश्वास पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे
येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली आणि त्यांना अभिवादन केले.
सातारा जिल्ह्यातील आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाला तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक बासी मर्ढेकर यांच्या मरडे येथील स्मारकाला भेट दिली.
बुधवारी सकाळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांना नंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्म व तिला भेट दिली. तसेच साताऱ्या त आगमन होण्याआधी पाटील यांनी कराड येथे प्रीती संगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर पाटील यांनी मुंबईत आचार्य अत्रे यांच्या स्मारकाला तसेच घाटकोपर येथील शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला तसेच कादंबरीकार रवा दिघे आणि नाटककार कवी विवाह शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन केले होते.
ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात
ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा
उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात
सातारा, १ जानेवारी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गुरुवारी संमेलनस्थळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्ट्याच्या उदघाटनाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियमवर हे संमेलन भरविण्यात आले आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन दालनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. तर नियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले.
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
रंगभूमीवर पुन्हा एकदा घुमतोय
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
मुंबई, दि. १ जानेवारी
मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेले 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटक नव्या दमाने रंगभूमीवर सुरू झाले असून रंगभूमीवर पुन्हा एकदा 'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट घुमतो आहे.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी लिहिलेले हे नाटक लोकप्रिय झाले. तोरडमल यांच्याच 'रसिकरंजन' नाट्यसंस्थेतर्फे १९७२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. अन्य नाट्य संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते.
नाटकातील 'प्रा. बारटक्के' भूमिका स्वतः प्रा. तोरडमल करत असत. तर प्रा. 'डी. डी. थत्ते' ही भूमिका अरुण सरनाईक, मोहन जोशी या दिग्गज अभिनेत्यांनीही साकारली. अभिनेते अतुल परचुरे, सुनील तावडे, राजन पाटीलही नाटकात होते. संपूर्ण नाटक म्हणजे 'ह हा ही, ही, हु, हू' च्या बाराखडीचा अक्षरशः धुमाकूळ होता.
आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे.
अभिनेते, दिग्दर्शक राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर, विजया राणे या पाच महिलांनी नाटकाची निर्मिती केली आहे.
'तरुण तुर्क म्हातारे अर्क' च्या नव्या संचात 'प्रा.बारटक्के' ही भूमिका अतुल तोडणकर तर 'प्रा. डी.डी.थत्ते' ही भूमिका अभिजित चव्हाण करत आहेत. या दोघांसह चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, निलेश देशपांडे, श्रुती पाटील आणि नीता पेंडसे हे कलाकार नाटकात आहेत. अशोक मुळ्ये,दिनू पेडणेकर नाटकाचे सूत्रधार असून संदेश बेंद्रे (नेपथ्य), तुषार देवल (पार्श्वसंगीत), श्याम चव्हाण (प्रकाश योजना) मंगल केंकरे (वेशभूषा) हे अन्य जबाबदारी सांभाळत आहेत.
मुंबईत रंगणार दोन दिवसांची रंगजत्रा
स्वामीराज प्रकाशन आयोजित दोन दिवसीय 'रंगजत्रा'
- स्वामीराज महोत्सवात तीन एकांकिका, दोन दीर्घांक आणि नाटक सादर होणार, रसिकांना मुक्त प्रवेश
मुंबई, दि. १ जानेवारी
स्वामीराज प्रकाशन संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारी वार्षिक रंगजत्रा अर्थात 'स्वामीराज महोत्सव' येत्या १७ आणि १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. ज्येष्ठ अभिनेते जनार्दन लवंगारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
महोत्सवात गावय, मास्क, थिम्मक्का या तीन एकांकिका, युगानुयुगे तूच, जन्म एक व्याधी हे दोन दीर्घांक आणि साठा उत्तरांची कहाणी हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे.
समारोप सोहळ्याला जेष्ठ अभिनेते अनिल गवस, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात अभिनेता चेतन दळवी (रंगसेवा पुरस्कार), विजय टाकळे (संहिता सन्मान), अमर हिंद मंडळ, दादर (प्रयोगघर पुरस्कार), लीला हडप (धुळाक्षर पुरस्कार), जयवंत देसाई (सेवाव्रती पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाचा महोत्सव दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या स्मृतीला समर्पित असून यशवंत नाट्य मंदिर, दादर येथे होणा-या महोत्सवासाठी नाट्यरसिकांना मुक्त प्रवेश आहे.
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
कठड्याचा स्लॅब कोसळून धोकादायक झालेल्या
इमारतीमधील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
- कार्यालय 'एमआयडीसी' त गेल्याने नागरिकांचीही गैरसोय
डोंबिवली, दि. १ जानेवारी
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. एमआयडीसी टपाल कार्यालय, के.वि. पेंढरकर महाविद्यालयामागे, डोंबिवली पूर्व येथे हे टपाल कार्यालय हलविण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील लक्ष्मी सागर इमारतीत हे टपाल कार्यालय होते. काही दिवसांपूर्वी या इमारतीचा स्लॅब ( गच्चीचा कठडा) कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नव्हती. स्लॅब कोसळल्यानंतर महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आणि इमारतीमधील रहिवासी, व्यावसायिक गाळे रिकामे केले होते.
डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे टपाल कार्यालय या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून होते. नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते सोयीचे होते. आता डोंबिवली एमआयडीसी भागात हे टपाल कार्यालय हलविण्यात आल्याने नागरिक व टपाल कार्यालयात येणा-यांना तिथे जाणे गैरसोयीचे ठरते आहे.
स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून हे कार्यालय मूळ इमारतीत आणण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
- ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर,दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य मानकरी
६ जानेवारीला पुरस्कार वितरण
मुंबई, दि. २९ डिसेंबर
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर, दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य पत्रकाराचा यात समावेश आहे. पत्रकार दिनी (६ जानेवारी २०२६) ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणा-या पुरस्कारासाठी सचिन अंकुश लुंगसे (लोकमत) यांची तर पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन करणार्या जयहिंद प्रकाशन पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांची निवड करण्यात आली आहे
कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार विवेक शंकर दिवाकर (नवराष्ट्र) यांना तर
पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार मुक्त पत्रकार अविनाश कोल्हे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा रमेश भोगटे पुरस्कार अशोक नागनाथ अडसूळ( लोकसत्ता) आणि चित्रपट व मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठीचा शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप अनंत ठाकूर यांना जाहीर झाला आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्या वरिष्ठ वृत्तवाहिनी कॅमेरामनसाठीच्या वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी कॅमेरामन पुरस्कारासाठी राजेश माळकर (न्यूज नेशन) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि निवड झालेल्या छायाचित्रकारांचा सत्कारही या वेळी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई, अजय कौतिकवार, अभिजित मुळये, समीर चवरकर यांच्या निवड समितीने ही निवड केली. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर, आझाद मैदान येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
शनिवार, २७ डिसेंबर, २०२५
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी-प्रा. मेधा सोमण
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी- प्रा. मेधा सोमण
'द्रौपदी : काल, आज, उद्या' महाकादंबरी प्रकाशित
मुंबई, दि. २७ डिसेंबर
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी होती. द्रौपदीचा मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन संस्कृत तज्ज्ञ, अभ्यासक व लेखिका प्रा. मेधा सोमण यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या महाकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डिंपल पब्लिकेशन'ने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थाम्याने अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणले असता आणि अश्वत्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती, त्याला मारू नका.' असे सांगते. यामागची द्रौपदीची विवेकबुध्दी स्पष्ट करताना प्रा.सोमण म्हणाल्या, कृपीला पतीवियोगाचे दुःख आहे. अश्वत्थाम्याला ठार केले तर तिला पुत्र वियोगाचे दुःख सहन होणार नाही. पुत्र वियोगाचे दुःख काय असते, ते मी अनुभवतेय. ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारले हे कळले आहे, तरीही ती आपला विवेक ढळू देत नाही.
'द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून, एकाच दुःशासनाकडून अत्याचार सहन करावा लागला. आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन, दुःशासनांशी सामना, संघर्ष करावा लागतोय. द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळाले, तसे आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना दा. कृ. सोमण म्हणाले, आज मी सगळ्या नक्षत्र, ताऱ्यांना घेऊन आलोय. अशोक समेळ यांच्या महकादंबर्या वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या शंभर आवृत्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचोत. डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखक समेळ यांची मुलाखत किरण वालावलकर, स्मिता गवाणकर यांनी घेतली. संग्राम समेळ, संजीवनी समेळ यांनी 'द्रौपदी' महाकादंबरीतील काही भागाचे अभिवाचन केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले तर अरूण घाडीगावकर यांनी आभार मानले.
छायाचित्रात डावीकडून कौतुक मुळ्ये, अशोक समेळ, किरण वालावलकर, प्रा. मेधा सोमण, दा. कृ. सोमण, अशोक मुळ्ये, अरुण घाडीगावकर
शनिवार, २० डिसेंबर, २०२५
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस' या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस'
या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
- भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीतर्फे आयोजन
डोंबिवली, दि. २० सप्टेंबर
भारत विकास परिषद आणि ध्रुव अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ डिसेंबर रोजी डोंबिवलीत 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) आणि त्यावरील लस' या विषयावर सकाळी अकरा वाजता एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या सदस्य डॉ. अंजली खाडिलकर या विषयावर माहिती देणार आहेत.
भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येतो. दरवर्षी साधारण १ लाख ३० हजार महिला दरवर्षी या रोगाच्या तडाख्यात सापडतात आणि ७५ हजारांहून अधिक महिला मृत्युमुखी पडतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ज्या HPV विषाणूमुळे होतो त्यावर आता लस उपलब्ध आहे.ही लस ७ ते ४० या वयोगटातील मुलींना / महिलांना घेता येऊ शकते. भारत विकास परिषदेच्या पुढाकाराने ही लस अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना ही लस घेण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी तसेच लसीकरणासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त महिला, मुलींनी वैयक्तिक किंवा पालकांसह व्याख्यानास उपस्थित राहावे. नावनोंदणीसाठी पालवी मोघे यांच्याशी
९६१९ १८५ ७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीने केले आहे.
शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय
लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
- लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा
- आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
यांची उदासीनता, अनास्था खेदजनक, संतापजनक
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
रिक्षा मीटर सक्ती चळवळ
शेजो उवाच -५
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
'रिक्षा मीटरसक्ती' या विषयावर गेली बारा वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक बातम्या दिल्या होत्या. मात्र खेदाची आणि संतापजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एकही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांचे स्थानिक व राज्य पातळीवरील नेते, स्थानिक सर्वपक्षीय नेते, नगरसेवक यांनीही या प्रकरणी अळी मिळी गुप चिळी अशी भूमिका घेतली.
रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी नेहमीच नांगी टाकली.
काही वर्षांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी सुरू केलेल्या रिक्षा मीटर सक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह स्वतः डोळे यांनी आपला दूरध्वनी क्रमांक जाहीर केला होता. रिक्षात बसल्यावर रिक्षा चालकाला सांगूनही त्यांने मीटर डाऊन केले नाही तर फोन केल्यावर शक्य तिथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वतः डोळे, वाहतूक पोलीस हजर राहात होते. मी व माझ्या कुटुंबीयांनानीही त्या वेळी मीटर न टाकणा-या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्याकडेच लेखी तक्रारी करणे, रिक्षात बसल्यावर मीटर टाकण्याचा आग्रह धरणे इत्यादी मार्ग अवलंबिले होते.
माझ्या आठवणीप्रमाणे २०१३/ १४ मध्ये लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी रिक्षा मीटर सक्ती विषय लावून धरल्याने कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती दृष्टीपथात आली असे वाटत होते. पण त्यावेळीही स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजकीय इच्छाशक्ती व रिक्षा मीटर सक्तीसाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता तेव्हा अन्य सर्व राजकीय पक्षांच्या रिक्षा चालक मालक संघटना होत्या. याचे पदाधिकारीही राजकीय पक्षांचेच लोकप्रतिनिधी होते. या विषयावर तेव्हा मनसेच्या स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. हा विषय हाती घेण्यास सांगितले होते. सुरुवातीला मनसेकडून फलक लावून रिक्षा मीटर सक्तीसाठी प्रयत्न केले गेले. नंतर त्यांनीही या विषयाकडे पाठ फिरवली.
भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स' असे म्हणवून घेतो. त्यामुळे भाजपप्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला हव्यात, आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या संघटनेच्या सदस्यांना तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला भाग पाडायला हवे, पण आजवर ते झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुठभर रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वेळोवेळी ई मेल करून, ट्विटरवर ट्विट करून लक्ष वेधून घेतले आहे. पण कोणालाही काही पडलेले नाही.
त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत
रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदान नाही
किंवा 'नोटा' वापरून निषेध.
लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून रिक्षा मीटर सक्तीसाठी पाठपुरावा केला होता त्या बातम्यांच्या लिंक्स
http://www.loksatta.com/vruthanta-news/no-any-action-on-rude-rickshaw-drivers-80909/
(मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात पदाधिकाऱयांची अळीमिळी गुपचिळी-लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१४ मार्च २०१३/ पान क्रमांक
http://www.loksatta.com/vruthanta-news/indisciplined-rikshaw-driver-on-the-root-of-disciplined-rikshaw-driver-81471/
(बेशिस्त रिक्षाचालक प्रामाणिक रिक्षाचालकांच्या मुळावर, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/woman-hitch-to-arrogant-rikshaw-driver-81470/
(उद्दाम रिक्षाचालकांना रणरागिणीचा हिसका, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/rickshaw-drivers-in-dombivli-impudence-behaviour-80269/
(पूल पार करावा लागतो म्हणून द्या मागू तेवढे भाडे-डोंबिवलीतील रिक्षाचालकांचे अजब तर्कट
लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १३ मार्च २०१३/ पान क्रमांक १)
http://www.loksatta.com/vruthanta-news/andolan-in-front-of-auto-rickshaw-drivers-for-takeing-the-fare-meter-79542/
(मुजोर रिक्षाचालकांपुढे रिक्षा संघटना आणि लोकप्रतिनिधींची नांगी/ लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १२ मार्च २०१३/ पान क्रमांक १
http://www.loksatta.com/vruthanta-news/rto-notice-to-riksha-driver-who-denay-fare-as-per-meter-77564/
मीटरनुसार भाडे नाकारणाऱया रिक्षाचालकाला आरटीओची नोटीस लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/९ मार्च २०१३
शेखर जोशी
१९ डिसेंबर २०२५
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा - आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा
- आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
- स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
- मोदी, फडणवीस यांचे गुणगान
- भाषणे सुरू होण्यापूर्वी आवाजाची पातळी ८८ डेसीबल
- महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात
- भाजपचाच महापौर हवा याचा चव्हाणांकडून अप्रत्यक्ष तर दोन्ही पाटील यांच्याकडून थेट उल्लेख
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
केरळसारख्या डावी विचारसरणी असलेल्या राज्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याचे सांगून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रासाठी, विकासासाठी योग्य ठिकाणी, योग्य वेळी मतदान करा, असे आवाहन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.
भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक कल्याण डोंबिवलीचे भविष्य ठरविणारी निवडणूक असून विचारसरणीला मतदान करा. ठरविलेले साध्य करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचे विचार पटवून द्यावेत, असेही चव्हाण म्हणाले.
आपण शहरांतील समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी पारदर्शक कारभार करणारा महापौर असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही व कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. केंद्रात आणि राज्यात अनुक्रमे राष्ट्रीय लोकशाही आघाडी व महायुतीचे शासन आल्यानंतर विकास कामांना गती मिळाली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचीही भाषणे झाली.
आवाजाची पातळी ८८ डेसीबेल
मेळाव्याची वेळ संध्याकाळीच साडेपाच अशी होती. मेळाव्याला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशा पथकाचे वादन, भाजप, फडणवीस, चव्हाण यांच्यावरील गाणी, मेळाव्यासाठी येणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणलेले ताशा पथक, स्पिकर लावून आणलेली रिक्षा या सगळ्या आवाजाची पातळी ८८ डेसीबेल इतकी होती. कानठळ्या आणि छातीत धडकी भरविणारा हा आवाज होता. भाषणांच्या वेळी असलेला आवाज सहन करण्यायोग्य होता. नियमानुसार निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची पातळी ४५ डेसीबेल इतकी असायला हवी.
स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
महापालिका निवडणूक असल्याने रवींद्र चव्हाण स्थानिक गंभीर प्रश्न, नागरी समस्यांवर अधिक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र चव्हाण यांनी त्यांना ओझरता स्पर्श केला. दररोज सकाळी नोकरीसाठी मुंबईत जाणारे येथील नागरिक, त्यांच्या अडचणी, शहरातील वाहतूक कोंडी हे प्रश्न आहेत. या सर्व समस्या येणाऱ्या काळात सोडवायच्या आहेत, इतकाच उल्लेख केला. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, रेल्वे स्थानक परिसराला पडलेला फेरिवाले व रिक्षाचालक यांचा विळखा, अरुंद रस्ते, न झालेली रिक्षा मीटर सक्ती, मुजोर व बेशिस्त रिक्षाचालक, शहरातील पाणी समस्या, घनकचरा आणि इतरही गंभीर नागरी समस्यांवर चव्हाण एका शब्दानेही बोलले नाहीत.
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान
चव्हाण यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार गुणगान गायले. पहेलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर,भाजप पुन्हा सत्तेवर आला तर राज्यघटना बदलण्यात येणार, असा लोकसभा निवडणुकीत विरोध पक्षाकडून करण्यात आलेला अपप्रचार, २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकास कामांना दिलेली गती, स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेले भरघोस अर्थसहाय्य याविषयी सांगितले.
दोन्ही पाटील म्हणाले भाजपचाच महापौर हवा
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांना मतदान करून महापालिकेत भाजपचाच महापौर बसला पाहिजे, असे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले तर भाजपचाच महापौर होणे ही कल्याण डोंबिवलीतील गरज असून कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे. भाजपचाच महापौर होईल, असे कपिल पाटील म्हणाले.
गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक
शेजो उवाच- २
आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या
चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम
- रस्ता व चौक नामफलक महिनाभर घेणार मोकळा श्वास
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १६ डिसेंबर
राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी घोषणा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठीही येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या चेहेफलकबाजीला तात्पुरता विराम मिळणार आहे. त्यामुळे रस्ता व चौक नामफलक एक महिनाभर तरी मोकळा श्वास घेतील.
सर्वपक्षीय राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्ता व चौक नामफलक आपल्याच वडिलांचे आहेत, या जागा आपली वैयक्तिक मालमत्ता आहे, असे वाटते. त्यामुळे कोणताही विचार न करता ही मंडळी रस्ता व चौकांचे नामफलक झाकून बिनधास्त चेहरे फलकबाजी करतात. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन व संबंधित अधिकारी यांचा यावर कोणताही वचक नसल्याने, संबंधितांना या बेकायदा फलकबाजीसाठी कोणताही दंड ठोठावला जात नसल्याने ही मंडळी चेहरेफलकबाजी करण्यासाठी सोकावली होती.
ज्या स्थानिक महनीय व्यक्तींची किंवा राज्य/ राष्ट्रीय स्तरावरील महापुरुषांची नावे रस्ता किंवा चौकाला देण्यात आली आहेत, ते नामफलक झाकून राजकीय मंडळी चेहरेफलकबाजी करत आहेत. वाढदिवस, अभिनंदन, निवड/ नियुक्ती, सण/ उत्सव शुभेच्छा इत्यादी प्रकारच्या चेहरे फलकबाजीचा यात समावेश आहे. समाज माध्यमातून यासंदर्भात वेळोवेळी लिहिले गेले, टीका केली गेली. या चेहरेफलकबाजीमुळे शहर विद्रुप, बकाल होते हे माहित असूनही लाज सोडलेली ही मंडळी वर्षानुवर्षे चेहरेफलकबाजी वसा घेतल्याप्रमाणे करत आहेत. रस्ता व चौक नामफलक झाकून केली जाणारी ही चेहरेफलकबाजी कायमची बंद झाली पाहिजे.
'नोटा' चा वापर करून चेहरेफलकबाजीचा निषेध करा
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, उमेदवार मतं मागायला घरी येतील तेव्हा निवडून आल्यानंतर मी फलकबाजी करणार नाही, कोणाला करू देणार नाही आणि कोणी केली तर मी तातडीने कारवाई करेन, असे लेखी हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्याची गरज आहे. रस्ता व चौक नामफलक झाकून चेहरे फलकबाजी करणा-यांना मत नाही. 'नोटा' चा वापर करून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त झाला पाहिजे.
शेखर जोशी
१६ डिसेंबर २०२५
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे... मीटर सक्ती नाही तर मत नाही
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
शेजो उवाच- ३
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे...
मीटर सक्ती नाही तर मत नाही
डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा मीटर सक्ती नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करत अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहेत. स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह कोणताही राजकीय पक्ष, नेते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस या मनमानीला आजपर्यंत आळा घालू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू आहे.
बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर दोन किलोमीटर आहे. त्यामुळे नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी ३५ रुपये आकारणे अपेक्षित आहे. पण या अंतरासाठी ६०/ ७० रुपये घेतात. याच अंतरासाठी रात्री बारा वाजल्यानंतरचे भाडे ४४ रुपये आहे.
भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर २.०९ किलोमीटर आहे. नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी दिवसा आणि रात्री बारा वाजल्यानंतर अनुक्रमे ५० आणि ६३ रुपये भाडे आकारले पाहिजे. मात्र रिक्षा चालकांकडून दिवसाच १२० रुपये आकारले जातात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणी प्रवासी तिथून येणार असेल तर अर्थात १५० पेक्षाही जास्त (किती ते त्या रिक्षाचालकावर अवलंबून) पैसे मागितले जातात. अशी ही मनमानी गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथून बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व येथे येण्यासाठी रिक्षा पकडली. आणि शेअर पद्धतीने प्रवासी आला तरी रिक्षा चालकांकडून प्रत्येक प्रवासी ३० रुपये घेतले जातात. रिक्षात मागे ३ आणि पुढे एक/ दोन प्रवासी बसवले जातात. खरे तर हे ही बेकायदा आहे. हे अंतर दोन किलोमीटर आहे. मीटर टाकले तर या अंतरासाठी ३५ रुपये होतात. म्हणजे रिक्षात वेगवेगळे प्रवासी बसले तरी प्रत्येकी तीन प्रवासी बसवले तर प्रत्येकी १२ रुपये आणि चार प्रवासी बसवले तर १० रुपयेच घेतले पाहिजेत.
कल्याण डोंबिवली महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवलीकर/ कल्याणकर नागरिकांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. मतं मागायला येणारे सर्वपक्षीय उमेदवार आणि राज्य व स्थानिक पातळीवरील सत्ताधारी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेते, स्थानिक पदाधिकारी, नेते यांना रिक्षा मीटर सक्तीची अंमलबजावणी न झाल्याप्रकरणी जाब विचारला पाहिजे. रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदार नाही किंवा 'नोटा' चा वापर अशी भूमिका घेतली पाहिजे. हीच संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही.
शेखर जोशी
१७ डिसेंबर २०२५
कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे..
कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त
मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे...
'रिक्षा मीटरसक्ती नाही तर मतदान नाही'
कडोंमपा निवडणूक २०२६
शेजो उवाच - ४
शेखर जोशी
डोंबिवली- कल्याणमध्ये रिक्षा चालक मालक संघटना आणि काही मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन बससेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. अपवाद फक्त बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते एमआयडीसी निवासी विभाग. प्रचंड प्रतिसादात ही बससेवा सुरू आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि मुजोर रिक्षाचालकांचा विरोध मोडून कडोंमपाची परिवहन बससेवा सक्षमपणे सुरू करण्याची गरज आहे.
डोंबिवली आणि कल्याण दोन्ही शहरे प्रचंड प्रमाणात विस्तारली असून नागरिकांना घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर जाण्यासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत जास्तीत जास्त मार्गांवर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहनची बससेवा सुरू झाली पाहिजे. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व ते रेल्वे स्थानक, डोंबिवली पूर्व अशी कडोंमपाची परिवहन सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र रिक्षा चालक मालक संघटना, रिक्षाचालकांच्या दबावामुळे ती रद्द करण्यात आली. काही मुजोर रिक्षाचालकांनी या बसवर दगडफेक केली होती. डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानक ते महापालिका ह प्रभावक्षेत्र कार्यालय अशी परिवहन सेवा आहे. मात्र ती नावाला, शोभेला असल्याने असून नसल्यासारखीच आहे. जेमतेम एखादा प्रवासी असतो किंवा नसतो. बसमध्ये चालक, वाहकच असतात. ही बस चालविण्याचे नाटक कशासाठी?
परिवहन सेवा सुरू झाली तर आमच्या पोटावर पाय येतो, असे रिक्षाचालक म्हणतात. मुळात हा दावा खोडसाळ व चुकीचा आहे. एक बस गेल्यावर पुढची बस येण्यासाठी पंधरा, वीस मिनिटांचा अवधी असेल तर ज्या प्रवाशांना थांबायचे आहे ते थांबतील. इतर प्रवासी रिक्षाचाच आधार घेतील. ठाण्यात, मुंबईत महापालिका परिवहन सेवा चालविली जातेच ना? डोंबिवली कल्याणमध्ये मुठभर रिक्षाचालकांचा कळवळा आणि हजारो प्रवाशांकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती आहे.
डोंबिवली व कल्याण दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर खरे तर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या बस उभ्या राहिल्या पाहिजेत. परिवहन सेवेचे बसथांबे असले पाहिजेत, त्याला प्राधान्य हवे. दोन्ही ठिकाणी उलट चित्र आहे. बाहेर पडल्यानंतर रिक्षातळ आहेत. डोंबिवली पूर्व भागात तर बाहेर पडल्यानंतर चार/ सहा वेगवेगळे रिक्षातळ आहेत. या रिक्षातळावरील रिक्षा शेअर पद्धतीने अमूकच ठिकाणी जाणार, दुसऱ्या रिक्षातळावरील रिक्षा तमूक ठिकाणी जाणार. हे कशासाठी? हा प्रकार बंद झाला पाहिजे. डोंबिवली पश्चिम भागाचा विचार केला तर जेमतेम कोपर रस्ता, पं. दीनदयाळ रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा फुले रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता आणि गणेश नगर, राजू नगर- बावनचाळ मार्गे जाणारा रस्ता इतके प्रमुख रस्ते आहेत. या सर्व मार्गांवर सुरुवात ते शेवट आणि तसेच उलट बाजूने शेवट ते सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा सुरू केली तर प्रचंड प्रतिसाद मिळेल. पण आजपर्यंत डोंबिवली पश्चिमेला महापालिका परिवहन सेवा सुरू झालेली नाही.
कल्याण डोंबिवलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी रिक्षा चालक मालक संघटना आणि रिक्षा चालकांपुढे अक्षरशः नांगी टाकली आहे. त्यामुळे इथे रिक्षा मीटर सक्ती होऊ शकली नाही. मुद्रीत किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाज माध्यमातून बातम्या आल्या की थातुरमातुर कारवाईचे नाटक पार पाडले जाते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आता संधी आहे. मतं मागायला घरी येणारे सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेते यांना जाब विचारण्याची आवश्यकता आहे. रिक्षा मीटरसक्ती नाही, सक्षम परिवहन सेवा नाही, तर मतदान नाही किंवा निषेध म्हणून 'नोटा' चा वापर, केला पाहिजे.
शेखर जोशी
१८ डिसेंबर २०२५
सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा!
'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा!
शेखर जोशी
शुक्रवारी सकाळी गुहागरहून गुहागर- भांडूप एसटीबसने येताना हे दोन्ही आजोबा महाडला बसमध्ये चढले. डावीकडे बसलेले हिरामण नागोठणेकर , उजवीकडे उभे असलेले नामदेव जाधव. दोघांची वये अनुक्रमे ८५ आणि ९०.
एसटी पूर्ण भरलेली होती. वाहकाला आपली आधार कार्ड दाखवून दोघेही जण कोणतीही तक्रार न करता शांतपणे उभे राहिले. दोघांना नागोठणे येथे जायचे होते. मात्र बस नागोठणे आगारात जाणार नसल्याने आधी काही अंतरावर उतरुन दोघेही वेगळ्या बसने किंवा अन्य जे मिळेल त्या वाहनाने घरी पोहोचणार होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने महाड येथे कीर्तन/ भजन सप्ताहासाठी हे दोन्ही आजोबा गेले होते.
बराच वेळ ते दोघे शांतपणे उभे होते. बसमधील एक प्रवासी माणगावला उतरणार आहेत, तिथे जागा होईल असे वाहकांने त्यांना सांगितले होते. त्यामुळे नागोठणेकर आजोबा थोडे पुढे गेले. माझ्या जागेवर बसा थोडा वेळ असे जाधव आजोबांना सांगून मी माझ्याजागेवरून उठलो. तर जाधव आजोबा चार पावले पुढे गेले आणि उभ्या असलेल्या नागोठणेकर आजोबांना मागे आसनावर येऊन बसायला सांगितले आणि ते उभे राहिले.
नागोठणेकर आजोबा आसनावर येऊन बसल्यावर त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. ते म्हणाले, खरे तर माझ्यापेक्षा जाधव वयाने पाच वर्षांनी मोठे नव्वदीचे आहेत. तुम्ही तुमच्या जागेवर त्यांना बसण्यासाठी सांगितले पण ते स्वतः न बसता त्यांनी मला बसायला सांगितले. का ते माहीतेय? मी नाही अशी मान हलवली. काही वर्षांपूर्वी माझी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे आणि म्हणून ते स्वतः उभे राहिले आणि मला बसायला दिले, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले. खरोखरच धन्य आहे.
माझ्या जागेवर नागोठणेकर आजोबांना बसायला दिल्यामुळे मी त्यांच्या शेजारीच उभा होतो. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा झाल्या. दरम्यान जाधव आजोबांनाही माणगावला बसायला जागा मिळाली.
नागोठणेकर आजोबा एसटीतच नोकरीला होते. आम्ही दोघेही जण आसपासच्या परिसरात जिथे कुठे कीर्तन, भजन, नामसप्ताह असेल तिथे अधूनमधून येत जात असतो. आपल्या धर्मात त्या त्या वयानुसार जी आश्रम व्यवस्था/ दिनचर्या सांगितली आहे त्यानुसार आम्ही दोघेही आता वानप्रस्थाश्रमाच्याही पुढील व्यवस्थेत म्हणजे संन्यास आश्रमात आहोत. संसारातील सर्व बंधनातून मुक्त होऊन/ त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी पूर्णपणे देवाप्रती लिन होणे, घराबाहेर/ गावाबाहेर राहून, सातत्याने भ्रमण करणे, संसारातील सर्व सुख दुःखापासून अलिप्त राहून देवाचे नामस्मरण करणे या संन्यासाश्रमात सांगितले आहे. आणि आम्ही तेच करतो आहोत, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले. हे सांगताना आम्ही कुणीतरी वेगळे आहोत, आम्ही काही जगावेगळे करत आहोत, असा कोणताही आव/ अभिनिवेश अजिबात नव्हता.
अर्धा तास झाल्यावर नागोठणेकर आजोबा उठून उभे राहायला लागले आणि मला म्हणाले तुम्ही तुमच्या जागेवर बसा, त्यावर आता तुमचे उतरायचे ठिकाण येईपर्यंत तुम्हीच बसा, असे मी त्यांना म्हटले. त्यांना बसतानाही संकोचल्यासारखे झाले होते. इतरवेळी लोकल/ लांब पल्ल्याच्या गाडीत जो अनुभव आपण घेतो त्या पार्श्वभूमीवर हा वेगळा अनुभव होता. या वयात तुम्ही दोघेही फिरता, सर्वच ठिकाणी राहण्याची/ जेवणाखाण्याची चांगली व्यवस्था होत असेलच असे नाही, मग याचा त्रास होत नाही का? यावर आजवर देवाने भरपूर दिले आहे. सुखी आहे. आता जे आयुष्य राहिले आहे ते सर्व देवाचे कोणाबद्दल, कशाहीबद्दल कसलीही तक्रार करायची नाही. देवाने आजचा दिवस छान घालवला तसा उद्याचाही दिवस छान जाईल, यावर विश्वास ठेवून तो जसा ठेवेल तसे राहायचे, असे उत्तर त्यांनी दिले.
नागोठणे यायच्या आधी जिथे या दोन्ही आजोबांना उतरायचे होते, ते ठिकाण आले. वाहकाने आवाज दिला आणि दोघेही त्या थांब्यावर उतरले. उतरण्याआधी मी या दोघांही 'कर्मयोग्यां'च्या पाया पडलो, त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा भेटीचा योग येईल तेव्हा भेटू या, असे म्हणत या नागोठणेकर, जाधव आजोबांचा निरोप घेतला.
शेखर जोशी
८ डिसेंबर २०२५
छायाचित्रात डावीकडून नागोठणेकर आजोबा, जाधव आजोबा.
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव
नवी दिल्लीत तीन दिवसांचा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील
ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन
नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर
सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत
नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली.
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत होणाऱ्या महोत्सवात 'स्वराज्याचा शौर्यनाद’ या नावाचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉल क्रमांक १२ मध्ये असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक शस्त्रे मांडण्यात येणार आहेत. तसेच मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्रेही असतील.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला प्रदर्शनात असणार आहे. महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्धपरंपरा, धातूशास्त्र, ‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्रनिर्मिती प्रक्रिया याचेही दर्शन घडणार असल्याची माहिती वर्तक यांनी दिली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराजांसह अनेक संत-महंत महोत्सवास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहनही वर्तक यांनी केले.
शनिवार, ६ डिसेंबर, २०२५
दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल!
दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल!
शेखर जोशी
गुहागर, दि. ६ डिसेंबर
'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले' असे म्हणतात, याची प्रचिती येथे रसिकांना आली. रत्नागिरीतील पाच कलाकारांनी तालसुरांची अप्रतिम मैफल गुहागर येथे रंगविली. निमित्त होते दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमाचे.
मूळचे गुहागरवासीय असलेले आणि गेल्या काही वर्षांपासून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गुहागराबाहेर पडलेले जोशी कुटुंबीय दरवर्षी गुहागर येथील 'ब्रह्मचैतन्य' या आपल्या निवासस्थानी येऊन दत्तजयंती उत्सव गेली काही वर्षे साजरा करत आहेत. या उत्सवासाठी माहेरवाशिणींसह सर्व जोशी कुटुंबीय एकत्र जमतात. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यापैकी हा एक कार्यक्रम बुधवारी झाला. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत 'ब्रह्मचैतन्य' वास्तूत हे सर्व कार्यक्रम पार पडले.
प्रसन्न जोशी (बासरी), उदय गोखले (व्हायोलिन), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), निखिल वझे (तबला), हरिश केळकर ( तालवाद्ये) हे कलाकार सहभागी झाले होते. सर्वच कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केले. स्वर/शब्दांशिवाय या सर्वांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी वाद्यांच्या साथीने सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात 'हंसध्वनी' राग सादरीकरणाने झाली. आणि त्यांनतर सर्व कलाकारांनी वाद्यवादनाच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची उत्तम व अद्ययावत ध्वनीव्यवस्था गुहागरच्याच निखिल ओक यांची होती.
निघालो घेऊन दत्ताची पालखी, केव्हा तरी पहाटे, लग जा गले, लाजून हासणे, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, तोच चंद्रमा नभात, ह्दयी प्रीत जागते, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, थकले रे नंदलाला, अबीर गुलाल उधळीत रंग, नीज माझ्या नंदलाला, बाजे मुरलिया इत्यादी मराठी, हिंदी गाणी सादर केली आणि उत्तरोत्तर कार्यक्रम चढत्या श्रेणीत रंगत गेला.
आता आम्ही जी गाणी सादर करणार आहोत ती तुम्ही ओळखा, असे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोखले यांनी सांगितले आणि रसिकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. त्यामुळे व्यासपीठावरील वादक कलाकार आणि रसिक प्रेक्षकांत आपसूकच भावबंध निर्माण झाला व रसिक कार्यक्रमात गुंतत गेले. काही गाण्यांची तर केवळ सुरुवात झाल्यानंतर लगेचच गाण्याचे शब्द काय आहेत, ते रसिक सांगत होते. अवीट गोडीची ही सर्वच गाणी रसिकांच्या हृदयात कोरली गेली असून या गाण्यांचे रसिकांच्या मनावर असलेले गारुड अद्यापही कायम आहे, याचेच प्रत्यंतर कार्यक्रमप्रसंगी पाहायला मिळाले. कलाकार एकेक गाणे सादर करताहेत आणि सर्व रसिक त्यावर गाणे गाताहेत, असेही पाहायला मिळाले.
'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' भैरवीने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम औपचारिकपणे संपला असला तरी रसिकांच्या मनात कलाकारांनी सादर केलेल्या तालसुरांचा नाद गुंजत राहिला. उदय जोशी, गणेश जोशी बंधूंनी वादक कलाकारांचा यथोचित सन्मान केला.
दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी सकाळी काकड आरती, फेर धरणे, नामस्मरण, भजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. सत्यनारायण पूजेसह औदुंबराच्या वृक्षाखालील पादुकांवर अभिषेक, दत्त नामावली याचाही यात समावेश होता. गणेश जोशी यांनी दुपारी बाराच्या सुमारास गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय - अवतरणिका वाचन केले.
संध्याकाळी सौ. स्मिता जोशी यांनी दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन सादर केले. त्यांना अनंता आणि श्रीराम वैशंपायन बंधूंनी अनुक्रमे ऑर्गन व तबल्याची संगीतसाथ केली. यावेळी जोशी कुटुंबातील महिलांनी दत्त जन्माचा पाळणाही सादर केला.
दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित अन्य कार्यक्रमात कीर्तनकार शिल्पा पटवर्धन यांचे सीतेवरील आख्यान/कीर्तन सोबतच विभावरी नेवरेकर, कल्याणी मेहेंदळे यांनी गाण्यांवर सादर केलेले कथ्थक नृत्य, सायंप्रार्थना, दुर्गादेवी देवळात गोंधळ, तन्वी दामले यांचा भक्तीगीत, नाट्यगीत मैफलीचा समावेश होता. ही संगीत मैफलही छान रंगली. मित्रवर्य अजय जोशीमुळे दत्तजन्मोत्सवात सहभागी होता आले आणि अन्यही सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता आला. गुहागरवासीय विक्रम खरे यांच्या सुग्रास भोजन/नाश्ता व्यवस्थेने हा आनंद आणखी द्विगुणित झाला.
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?
डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती!
- महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून
झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार?
शेखर जोशी
भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो.
नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात
छायां अन्य कुर्वन्ति:,
तिष्ठन्ति स्वयं आतपे:,
फलान्यपि परार्थाय:
वृक्षाः सत्पुरुषा इव:
असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता.
' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला.
आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे. भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे.
या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला. झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी.
शेखर जोशी
२६ नोव्हेंबर २०२६
👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही
भाग
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५
रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग
श्रीराम मंदिराच्या पायातील रामायण शिल्पांपैकी
काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग
- नाशिककर आणि लोंढे कुटुंबीयांसाठी गौरवाचा क्षण
नाशिक, दि. २५ नोव्हेंबर
अयोध्येतील श्रीराम मंदिरावर मंगळवारी धर्मध्वजारोहण झाले आणि नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे व लोंढे घराण्यासाठी हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण ठरला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या तळातील पायावर (lower plinth) जी रामायण शिल्पे आहेत, त्यातील काही शिल्पे घडविण्याचे भाग्य लोंढे यांना लाभले.
अयोध्येत श्रीराम मंदिरावर पवित्र भगवा ध्वज अभिमानाने, डौलाने उभारला गेला आणि माझे डोळे भरून आले. रामरायाने माझ्याहीकडून सेवा करून घेतली. यात माझ्या सहकाऱ्यांचाही मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञतेची भावना यानिमित्ताने लोंढे यांनी व्यक्त केली.
आमच्या पुढील काही पिढ्यांना सांगायला आनंद होईल, की नाशिकच्या शिल्पकार लोंढे घराण्यातील एका कलाकाराला हा सन्मान मिळाला, मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी दिली.
शेखर जोशी
२५ नोव्हेंबर २०२५
(सर्व छायाचित्रे संदीप लोंढे यांच्या फेसबुक पोस्टच्या सौजन्याने)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...




























